राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज समारोप, 21 पक्षांना निमंत्रण

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा आज समारोप, 21 पक्षांना निमंत्रण

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज, सोमवारी श्रीनगर येथे समारोप होणार आहे. या समारोपाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 21 पक्षांना निमंत्रित करण्यात आले आहे. तथापि, पाच पक्षांनी उपस्थितीबाबत असर्थता दर्शविली असून केवळ 12 पक्षच या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

‘भारत जोडो’ यात्रेला 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून सुरुवात झाली. आज, सोमवारी या यात्रेला 145 दिवस पूर्ण होत असून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची ही यात्रा 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून सुमारे 3570 किलोमीटर चालली. रविवारी श्रीनगरच्या लाल चौकात राहुल गांधी यांनी तिरंगा फडकावल्यानंतर यात्रा समाप्त झाली. आज, सोमवारी ते काँग्रेसच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकावणार असून श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर या यात्रेचा औपचारिकरित्या समारोप होणार आहे. तिथे राहुल गांधी यांची सभा होईल.

एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक (DMK), माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय जनता दल (RJD), नितीश कुमार यांची जनता दल युनायटेड (JDU), उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shiv Sena), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPI-M), भाकपा (CPI), व्हीसीके, केरळ काँग्रेस, फारुख अब्दुल्ला यांची जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स, मेहबुबा मुफ्ती यांची जम्मू काश्मीर पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (PDP) आणि शिबू सोरेन यांची झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) हे या समारोप सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

अण्णा द्रमुक (AIDMK), जगमोहन रेड्डी यांची वायएसआरसीपी (YSRCP), नवीन पटनायक यांची बीजेडी (BJD), ओवैसी यांची एमआयएम (AIMIM) तसेच एआययूडीएफ या पक्षांना निमंत्रित केले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर, काही पक्ष सुरक्षिततेच्या कारणास्तव सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात येते. समारोपाच्या कार्यक्रमात सिनेनिर्माते विशाल भारद्वाज आणि त्यांची पत्नी व गायिका रेखा भारद्वाज सहभागी होणार आहे.

 

हेही वाचा – ऑस्ट्रेलियात तिरंगा घेऊन उभ्या असलेल्या भारतीयांवर खलिस्तान समर्थकांचा हल्ला, पाच जखमी

First Published on: January 30, 2023 9:10 AM
Exit mobile version