शिपायांना बोलावण्यासाठी आता ‘बेल’ बंद, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश

शिपायांना बोलावण्यासाठी आता ‘बेल’ बंद, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आदेश

नवी दिल्ली : विविध स्तरांवरील व्हीव्हीआयपी संस्कृती संपवण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. विभागीय कार्यालयांमध्ये शिपायांना बोलावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बेल हटविण्याचे आदेश त्यांनी मंगळवारी जारी केले. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी खुद्द वैष्णव यांनी आपल्या कार्यालयात लावलेली बेल काढून टाकली आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याला समान सन्मान देण्यासाठी आणि व्हीव्हीआयपी संस्कृतीची मानसिकता बदलण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले. कार्यालयीन शिपायांना बोलावण्यासाठी बेलचा वापर थांबवावा, त्याऐवजी त्यांना वैयक्तिकरीत्या बोलावण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. रेल्वेच्या कामकाजात प्रत्येक कर्मचाऱ्याच्या 100 टक्के क्षमतेचा वापर करण्यासाठी व्हीव्हीआयपी संस्कृती पूर्णपणे हटविण्याची गरज असल्याचे रेल्वेमंत्र्यांचे म्हणणे आहे.

भारत गौरव ट्रेनची घोषणा
बैसाखी उत्सवानिमित्त, भारतीय रेल्वेने मंगळवारी शीख धर्माच्या अनेक पवित्र स्थळांसाठी भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली. 10 दिवसांच्या प्रवासात या विशेष ट्रेनमधून 678 भाविक प्रवास करू शकतील. ही धार्मिक यात्रा लखनऊ येथून 5 एप्रिलला सुरू होईल आणि 15 एप्रिलला संपेल.

मुंबई सेंट्रल स्थानकाचा पुनर्विकास
पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई सेंट्रल स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात 850 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत देशभरातील 1 हजार 275 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास करण्यात येणार आहे.

प्रवाशांच्या डाटाची विक्री?
भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनचे (आयआरसीटीसी) रेलयात्री हे अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून यूजर्स तिकीट बुकिंग, पीएनआर स्टेट्स चेक करतात. देशातील ट्रेन यात्रेसंदर्भात इतर माहितीही या अॅपद्वारे प्रवाशांना मिळते. रेलयात्री अॅपवरून हॅक झालेला अंदाजे 31 दशलक्ष डेटा पॉइंट्सचा संच डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. युनिट 82 नावाच्या हॅकरने पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली होती. डिसेंबर 2022मध्ये डेटा हॅक झाल्याचा दावा हॅकरने केला आहे.

First Published on: February 22, 2023 10:07 AM
Exit mobile version