Raj Meet Shah : राज ठाकरेंची मध्यरात्री शहा-नड्डांशी चर्चा, म्हणाले- मला या सांगितले; संघाचाही हिरवा झेंडा

Raj Meet Shah : राज ठाकरेंची मध्यरात्री शहा-नड्डांशी चर्चा, म्हणाले- मला या सांगितले; संघाचाही हिरवा झेंडा

नवी दिल्ली – राज ठाकरे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आधीच दिल्लीत पोहोचले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत राज ठाकरेंनी मध्यरात्री चर्चा केल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांनी माध्यमांशी अनौपचारिक चर्चेमध्ये मात्र भेटीचे कारण आणि चर्चा गुलदस्त्यात ठेवली. मला या सांगितले, आणि मी आलो, एवढंच ते म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, भाजप नेत्यांच्या भेटीसाठी आलो आहे. मला फक्त ‘या’ असं सांगितलं आहे. याआधी राज ठाकरे यांचे कृष्णकुंज असेल त्यानंतर शिवतीर्थ या निवासस्थानी भाजप नेते येऊन चर्चा करत होते. मात्र प्रथमच राज ठाकरे हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली दरबारी गेले आहेत. मनसे, भाजप युती झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणाचे समीकरण बदलणार आहे.

मनसे-भाजप युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटेल आहे की, राज ठाकरे आणि भाजपची विचारधारा सारखीच आहे. आम्ही सर्व हिंदुत्ववादी विचारांचे आहोत. राज ठाकरे सोबत आल्यास महायुतीला त्यांचा फायदाच होईल. भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरमधील उमेदवार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज ठाकरे यांचे महायुतीत स्वागत असल्याचे म्हटले आहे.

मनसे-भाजप युतीला संघाचाही हिरवा झेंडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीला भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही हिरवा झेंडा दाखवला आहे. राज ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यांपासून हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरला आहे. माहिम येथील समुद्रात बांधण्यात येणाऱ्या अनधिकृत दर्ग्याला राज ठाकरेंनी कडाडून विरोध केला. त्यानंतर राज्य सरकारने तत्काळ तेथील बांधकाम हटवले. मशिदीवरील भोंग्यांचा विषय राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात लावून धरला होता. तेव्हा झालेल्या आंदोलनात 13 हजारांहून अधिक मनसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याचे राज ठाकरे त्यांच्या अनेक सभांमधून सांगत असतात.

मोदींबद्दलची भाषा मवाळ

राज ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलची भाषाही गेल्या काही काळापासून मवाळ झाली आहे. 2019 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेला विरोध यंदा त्यांच्या भाषणात कुठेही दिसत नाही. उलट 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हा मनसैनिकांनीही आनंदोत्सव साजरा करावा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते.

‘ठाकरे’ नावाचे मॅजेक आणि मराठी मॅग्नेट

उद्धव ठाकरे भाजपसोबत नसल्यामुळे ‘ठाकरे’ नावाचे मॅजेक आणि मराठी मॅग्नेट दुरावल्याचीही उणिव भाजप नेत्यांना सतावत आहे. राज ठाकरे महायुतीत आल्यास ठाकरे नावाचा करिष्मा त्यांच्यासोबत राहिल आणि याचा लोकसभेसोबतच विधानसभा आणि आगामी मुंबईसह राज्यातील विविध महापालिका निवडणुकीतही फायदा होईल, हा दूरचा विचारही भाजप नेतृत्वाने केलेला दिसत आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या मनसे आणि भाजप युतीला वेग आल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : Raj Thackeray reaches Delhi : मनसे-भाजप युतीसाठी राज ठाकरे दिल्ली दरबारी दाखल

First Published on: March 19, 2024 9:13 AM
Exit mobile version