भाजपचे लोकसभेतील संख्याबळ घटले

भाजपचे लोकसभेतील संख्याबळ घटले

देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला आहे. नाना पटोले यांच्यानंतर आता आणखी एका खासदारानं भाजपला रामराम करत काँग्रेसचा हात हातात धरला आहे. शिवाय एका आमदारानं देखील भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. राजस्थानमधील खासदार हरीशचंद्र मीणा आणि आमदार हबीबुर रहमान यांनी  बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी भंडारा – गोंदियाचे खासदार असलेले नाना पटोले यांनी देखील पक्ष नेतृत्वावर टीका करत भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, खासदार हरीशचंद्र मीणा यांच्या राजीनाम्यामुळे भाजपचे लोकसभेतील संख्याबळ २७२ या जादुई आकड्याखाली आले आहे.

राजस्थानमधील दौसा लोकसभा मतदारसंघातील खासदार हरीश्चंद्र मीणा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना विधानसभेची उमेदवारी देखील देण्यात आली.  काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गहलोत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांच्या उपस्थितीमध्ये हरीश्चंद्र मीणा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ साली झालेल्या निवडणुकीमध्ये मीणा यांनी त्याचे ज्येष्ठ बंधू आणि काँग्रेसचे उमेदवार असलेले नमो नारायण मीणा यांच्यावर विजय मिळवला होता. हरिश्चंद्र मीणा यांना भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा सध्या राजस्थानमधील राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.

वाचा – राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली

लोकसभेत भाजप २७०वर

राजस्थामधील खासदार हरीशचंद्र मीणा यांनी बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता भाजपचे संख्याबळ २७० वर आले आहे. ७ डिसेंबर रोजी राजस्थानध्ये विधानसभेच्या २०० जागांसाठी मतदान होत आहे. २०१४ साली भाजपनं ५३४ पैकी २८२ जागा जिंकत लोकसभेत एकहाती बहुमत मिळवले होते. दरम्यान हरिश्चंद्र मीणा यांच्यानंतर आता उत्तर प्रदेश, झारखंड, हरयाणा आणि बिहार राज्यांमधील खासदार देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास उत्सुक असल्याची चर्चा आहे.

First Published on: November 15, 2018 9:38 AM
Exit mobile version