India – China : राजनाथ सिंह यांचे अन्य नेत्यांशी हस्तांदोलन अन् चीनच्या मंत्र्यांबरोबर…

India – China : राजनाथ सिंह यांचे अन्य नेत्यांशी हस्तांदोलन अन् चीनच्या मंत्र्यांबरोबर…

The Union Minister for Defence, Shri Rajnath Singh chaired a defence meeting of Shanghai Cooperation Organisation (SCO), in New Delhi on April 28, 2023.

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील (India – China) संबंध अजूनही तणावपूर्णच आहेत. गुरुवारी राजधानी दिल्लीत घडलेल्या घटनेवरून हे अधोरेखित झाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा दोघांनी एकमेकांना हात जोडून शुभेच्छा दिल्या. तर, इतर देशांच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर राजनाथ सिंह यांनी प्रेमाने हस्तांदोलन केले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी चीनचे स्टेट कौन्सिलर आणि संरक्षणमंत्री जनरल ली शांगफू (Chinese Defence Minister Li Shangfu) यांची भेट घेतली. उभय मंत्र्यांनी भारत-चीन सीमा भागातील घडामोडी तसेच द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली. भारत आणि चीन यांच्यातील संबंध अधिक दृढ होणे, हे सीमेवर शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यावर अवलंबून आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले.

विद्यमान करारांच्या उल्लंघनामुळे द्विपक्षीय संबंधांचा संपूर्ण आधारच नष्ट झाला आहे, असे सांगत राजनाथ सिंह यांनी, सीमेवर तणावमुक्त स्थिती राहावी यासाठी, सीमेवरील सैन्य मागे घ्यावे लागेल, याचा पुनरुच्चार केला. 28 एप्रिल 2023 रोजी आयोजित शांघाय सहकार्य संघटनेतील (Shanghai Cooperation Organisation – SCO) देशांच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी चीनचे संरक्षणमंत्री दिल्लीत आले आहेत.

भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी हस्तांदोलन न करणे ही सहज गोष्ट नाही. जेव्हा जेव्हा राजनाथ सिंह हे अन्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांना भेटतात, तेव्हा ते हस्तांदोलन करून त्यांचे स्वागत करतात. गुरुवारी त्यांनी इराण, कझाकिस्तान, ताजिकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांशी हस्तांदोलन केले आणि त्याची छायाचित्रे शेअर केली.

भारताची स्पष्ट भूमिका
विशेष म्हणजे द्विपक्षीय बैठक सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये पुन्हा सहकार्य सुरू करण्याचा नवा प्रस्ताव चीनने ठेवला होता, मात्र सीमेवर शांतता प्रस्थापित होईल, तेव्हाच हे शक्य होईल, असे सांगून चीनचा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. सीमावाद बाजूला ठेवून चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी दोन्ही देशांदरम्यान नव्याने सुरुवात करण्याचा मुद्दा मांडला. तथापि, यासाठी सीमेवरील परिस्थिती सामान्य असणे गरजेचे आहे. जर संबंध बिघडले असतील तर त्याला फक्त चीनच जबाबदार आहे, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले.

First Published on: April 28, 2023 3:11 PM
Exit mobile version