राज्यसभा होणार बिनविरोध, ७ जागांसाठी आले ७ अर्ज!

राज्यसभा होणार बिनविरोध, ७ जागांसाठी आले ७ अर्ज!

प्रियंका चतुर्वेदी यांचा अर्ज भरण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते

राज्यसभेतल्या ७ विद्यमान सदस्यांची टर्म संपत असल्यामुळे या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. मात्र, आता या सातही जागा बिनविरोध होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. कारण, या ७ जागांसाठी त्या त्या पक्षांनी नेमकेच उमेदवार दिले आहेत. एकूण ७ उमेदवारांनी अर्ज भरल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. यामध्ये भाजप ३, राष्ट्रवादी काँग्रेस २ तर काँग्रेस-शिवसेनेच्या प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज भरले आहेत. आज विधानसभेमध्ये या सातही जणांनी आपले अर्ज सादर केले. यावेळी सर्वच पक्षाच्या राज्यातील वरीष्ठ आणि महत्त्वाच्या नेतेमंडळींनी हजेरी लावली होती.

शिवसेना-काँग्रेसकडून प्रत्येकी एक अर्ज

या ७ जणांमध्ये भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवले(सहयोगी) आणि डॉ. भागवत कराड यांनी अर्ज भरले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि फौजिया खान यांनी अर्ज भरले आहेत. तर काँग्रेस आणि शिवसेनेकडून अनुक्रमे राजीव सातव आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी अर्ज भरले आहेत. दुपारी १२ वाजता फौजिया खान यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे नेते राजीव सातव आदींसह सरकार मधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


वाचा सविस्तर – भाजपकडून उदयनराजे भोसले, रामदास आठवलेंना उमेदवारी!

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी देखील अर्ज

याशिवाय, महाविकास आघाडीच्यावतीने विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे आमदार नरहरी झिरवाळ यांचा अर्ज आज दाखल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार सरोज अहिरे आदी उपस्थित होते.

First Published on: March 13, 2020 4:27 PM
Exit mobile version