Rakesh Jhunjhunwala new house: 14 फ्लॅट तोडून राकेश झुनझुनवाला बनवतायत 14 मजली आलिशान ‘महाल’; जाणून घ्या खासियत

Rakesh Jhunjhunwala new house: 14 फ्लॅट तोडून राकेश झुनझुनवाला बनवतायत 14 मजली आलिशान ‘महाल’; जाणून घ्या खासियत

rakesh zunzunwala

नवी दिल्ली : बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले देशातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आता मुंबईतील सर्वात महागड्या भागात 14 मजली आलिशान महालात राहणार आहेत. सध्या ते एका अपार्टमेंट ब्लॉकमध्ये दोन मजली घरात राहतात. पण लवकरच त्यांचे नवीन निवासस्थान हे मलबार हिलमध्ये असेल. अनेक उद्योगपती आणि कॉर्पोरेट जगतातील नामवंत व्यक्ती या भागात राहतात. हे घर बांधण्यासाठी झुनझुनवाला यांनी 371 कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती.

झुनझुनवाला हे 5.7 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह देशातील 36 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्या स्टेटसनुसार त्यांचे नवीन घरही तयार केले जातेय. मलबार हिल हा मुंबईचा सर्वात महागडा परिसर मानला जातो. येथे एका चौरस फुटाची किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. सज्जन जिंदाल, आदी गोदरेज आणि बिर्ला कुटुंबीयही मलबार हिलमध्ये राहतात. मलबार हिलवरूनही अरबी समुद्राचे नयनरम्य दृश्य दिसते.

14 फ्लॅट पाडूनच उभा राहणार आलिशान महाल

टाईम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, झुनझुनवाला यांच्या 14 मजली बंगल्याचे बीजी खेर मार्गावर बांधकाम सुरू आहे आणि सध्या बांधकाम वेगाने सुरू आहे. यापूर्वी या ठिकाणी 14 फ्लॅट होते जे राकेश आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी 371 कोटी रुपयांना खरेदी केले होते. आता हे फ्लॅट पाडून नवीन बंगला बांधला जात आहे. एकूण 2700 चौरस फूट जागेवर 57 मीटर उंचीची इमारत बांधण्यात येणार आहे.

पूर्वी या भूखंडावर रिजवे अपार्टमेंट होते. त्यात 14 फ्लॅट आणि पार्किंगची जागा होती. हे अपार्टमेंट पूर्वी दोन खासगी क्षेत्रातील बँकांच्या मालकीचे होते. राकेश आणि रेखा झुनझुनवाला यांनी 2013 मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून यापैकी सात फ्लॅट्स पहिल्यांदा 176 कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यानंतर त्यांनी 2017 मध्ये HSBC कडून उर्वरित अपार्टमेंट 195 कोटींना घेतले.

नव्या घराचे वैशिष्ट्ये

सूत्रांनी सांगितले की, त्याचे बांधकाम पूर्ण होताच 61 वर्षीय झुनझुनवाला आपल्या कुटुंबासह येथे स्थलांतरित होतील. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी रेखा 57 वर्षे, मुलगी निष्ठा आणि जुळी मुले आर्यमन आणि आर्यवीर असा परिवार आहे. हे कुटुंब सध्या हँगिंग गार्डनजवळील इल पलाझो अपार्टमेंट इमारतीत राहते. झुनझुनवाला यांच्या नवीन घरात एका मजल्यावर बँक्वेट हॉल, एका मजल्यावर स्विमिंग पूल, एका बाजूला जिम, एका मजल्यावर होम थिएटर अशा गोष्टी असतील. इमारतीच्या वरच्या मजल्यावर 70.24 चौरस मीटरचे कंझर्व्हेटरी एरिया, री-हीटिंग किचन, पिझ्झा काउंटर, बाहेरील आसनव्यवस्था, बाग, स्नानगृह आणि खुली टेरेस असेल. त्याच्या नवीन घरात सर्व सुखसोयी असतील.

झुनझुनवाला 12व्या मजल्यावर राहणार

महापालिकेला सादर केलेल्या इमारतीच्या आराखड्यानुसार बाराव्या मजल्याला मास्टर्स फ्लोअर असे नाव देण्यात आलेय. राकेश झुनझुनवाला येथे राहणार आहेत. या मजल्यावर एक मोठा बेडरूम, स्वतंत्र स्नानगृह, ड्रेसिंग रूम आणि एल-आकाराची लिव्हिंग रूम तयार केली जाईल. बाल्कनी, पॅन्ट्री, सलून याशिवाय स्टाफ रूमही असतील. 11वा मजला तीन मुलांसाठी असेल. दोन्ही मुलांसाठी दोन बेडरूम बांधले जातायत. दोन्ही शयनकक्षांना एक प्रशस्त टेरेस देखील जोडण्यात येईल. या मजल्याच्या दुसऱ्या बाजूला मुलीची बेडरूम असेल. त्याच्यासोबत बाल्कनीही असेल. ड्रेसिंग रूम, स्टडी आणि बाथरूमदेखील असेल. झुनझुनवालाच्या वास्तुविशारदांनी सादर केलेल्या योजनेत असे सांगण्यात आले आहे की, नवव्या मजल्यावर तीन केबिन, दोन बाथरूम, स्टाफ एरियासह एक पॅन्ट्री असेल.

आठव्या मजल्यावर जिम

आठव्या मजल्यावर एक जिम बांधली जात आहे, ज्यामध्ये दोन मसाज रूम, एक स्टीम रूम आणि एक बाथरूम असेल. सातव्या मजल्यावर एक इन्फिनिटी पूल असेल ज्यातून मोकळे आकाश दिसेल. सर्व्हिस फ्लोअर सहाव्या मजल्यावर असेल. पाचव्या मजल्यावर होम थिएटर, लाउंज, स्नानगृह आणि उपकरणे कक्ष बांधले जातील. तळमजल्यावर बँक्वेट हॉल बांधला जात आहे. चौथा मजला पाहुण्यांच्या सत्कारासाठी असेल. येथे एल आकाराचे स्वयंपाकघर बांधले जात आहे.
पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर काही मध्यम आकाराच्या खोल्या, स्नानगृहे आणि स्टोरेज एरिया असतील. तळमजल्यावर तीन पट उंचीची लॉबी आणि फुटबॉल कोर्ट बांधण्याची योजना आहे. तळघर सेवा आणि पार्किंगसाठी निश्चित केले जाईल. पाच सदस्यांच्या कुटुंबासाठी सात पार्किंग स्‍लॉट तयार केले जात आहेत. झुनझुनवाला हे आयकर अधिकाऱ्याचे पुत्र आहेत. शेअर बाजारातून त्यांनी संपत्ती कमावलीय. कॉलेजमध्ये असताना त्यांनी शेअर्सचा व्यापार सुरू केला. आज ते अब्जाधीश आहे.

First Published on: January 7, 2022 10:33 AM
Exit mobile version