राम मंदिरासाठी विहिंपने मागवले ७० ट्रक भरून दगड

राम मंदिरासाठी विहिंपने मागवले ७० ट्रक भरून दगड

२०१९ च्या लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत. तसा राम मंदिराचा मुद्दा पून्हा प्रकाशझोतात आणला जात आहे. या मुद्द्याचे अनेकदा निवडणुकांमध्ये विविध पक्षाकडून भांडवल केले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिर उभारणारच असा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. त्यात काही दिवसांपूर्वी शिवसेनेचीदेखील भर पडली आहे. शिवसेनेने राम मंदिर उभारण्याची हाक दिलेली आहे. त्यामुळे अयोध्येत वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. आता विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर उभारणीच्या कामासाठी ७० ट्रक दगड मागवल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अयोध्येत वातावरण बिघडले आहे.

अयोध्येतल्या वादग्रस्त रामजन्मभूमीबाबत २९ ऑक्टोबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर कशा प्रकारे बांधणार आहोत, त्याचा आराखडा तयार केला आहे. परिषदेने ७० ट्रक दगडांची ऑर्डर दिली आहे. पुढील काही दिवसांत दगडांनी भरलेले ट्रक अयोध्येत दाखल होणार आहेत. परवानगी मिळाल्यानंतर त्या ठिकाणी बहुमजली राम मंदिर बांधता यावे यासाठी विहिंपने तयारी केली असल्याचे म्हटले जात आहे. विहिंप कारागिरांशी बातचित करत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय याबाबत म्हणाले की, राम मंदिर आम्हाला लवकर उभे करायचे आहे. त्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय.

संबधित वादग्रस्त जमीन ज्या ठिकााणी आहे. तेथे ये-जा करणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. स्थानिक मुस्लिम संघटनांनी विश्व हिंदू परिषदेच्या या कामांवर नाराजी व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेला प्रशासनाने रोखायला हवे. अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

वाचा – ग्रीन फटाके फोडा म्हणता, पण हे ‘ग्रीन फटाके’ म्हणजे काय रे भाऊ?

First Published on: October 24, 2018 6:40 PM
Exit mobile version