पेट्रोल-डिझेलच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर रामदास आठवलेंचा माफीनामा

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे जनता एका बाजुला त्रस्त झाली असताना दुसऱ्या बाजुला मात्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भलतेच वक्तव्य केल्यामुळे वाद ओढवून घेतला होता. असंवेदनशील वक्तव्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यामुळे त्यांनी आता सारवासारव करत जनतेची माफी मागितली आहे. “माझा हेतू जनतेच्या भावना दुखावण्याचा नव्हता. मी एका सामान्य माणसापासून मंत्री झालो आहे. मला जनतेच्या समस्यांची जाण आहे. मी सरकारचा घटक असून पेट्रोल-डिझेलच्या दरात घट करावी, अशी मागणी सातत्याने करत आलो आहे.” आठवले यांनी सारवासारव करताना याचे खापर मात्र पत्रकारांवर फोडले आहे.

काय म्हणाले होते आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले शनिवारी जयपूर येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमंतीबाबत काही प्रश्न विचारले. यावर त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देताना म्हटले की, “पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे मला काही फरक पडत नाही. मी एक मंत्री आहे, त्यामुळे मला पेट्रोल-डिझेल मोफत मिळते.” यापुढे जात आठवले म्हणाले की, “जर माझे मंत्रीपद गेले तर कदाचित मला पेट्रोल-डिझेल विकत घ्यावे लागेल आणि सामान्य जनतेप्रमाणे मलाही त्याची झळ बसेल. सामान्य जनता वाढत्या दरामुळे त्रस्त झाली असून इंधनाचे दर कमी व्हायला पाहीजेत.”, अशी भावना आठवले यांनी व्यक्त केली होती.

रविवारी पेट्रोल २८ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले

देशभरात रोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. आजही यामध्ये वाढ झालेली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर ८९.२९ रुपये लिटर आहे तर डिझेल ७८.२६ रुपये प्रिति लिटर मिळत आहे. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात तर पेट्रोलने नव्वदी देखील पार केली आहे. मुंबईसह राजधानी दिल्लीतही स्थानिकांना इंधन दरवाढीचा सामना करावा लागतो आहे. दिल्लीतील पेट्रोलचा आजचा दर ८१.९१ रुपये प्रतिलिटर असून, डिझेलचा दर ७३.७२ रुपये प्रितिलिटर इतका आहे. दरम्यान ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या इंधन दरवाढीमुळे लोक हैराण झाले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या या वाढत्या दरवढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर देखील होताना दिसतो आहे.

 

वाचा : पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन भाजप सरकार ट्रोल
First Published on: September 16, 2018 4:34 PM
Exit mobile version