‘बेरोजगारांची लग्न वेळेत होत नसल्यामुळेच बलात्कार वाढतायत’, काटजूंनी पाजळले ज्ञान

‘बेरोजगारांची लग्न वेळेत होत नसल्यामुळेच बलात्कार वाढतायत’, काटजूंनी पाजळले ज्ञान

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच खळबळ उडवून देणारे सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी पुन्हा एकदा एक खळबळजनक विधान केले आहे. आता त्यांनी हाथरस बलात्कार प्रकरणावर निषेध व्यक्त करताना पुन्हा आक्षेपार्ह आणि नव्या वादाला तोंड फोडणारे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, बलात्काऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहीजे. मात्र देशातील वाढती बेरोजगारी आणि बेरोजगारांची वेळेवर लग्न होत नसल्यामुळे लैंगिक अत्याचार देशात वाढत असल्याचे काटजू म्हणाले आहेत.

 

काटजू यांनी फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. त्यात ते म्हणतात की, पुरुषाच्या लैंगिक गरचा अशा प्रकरणात लक्षात घेतल्या पाहीजेत. असे म्हटले जाते की, “अन्नानंतर मानवाची मुलभूत गरज ही सेक्स आहे. भारत हा पुराणमतवादी विचारांचा समाज असलेला देश आहे. इथे बहुतेक लग्नानंतरच अनेकजण पहिल्यांदा सेक्स करतात. तसेच इथे कोणत्याही मुलीला बेरोजगार तरुणाशी लग्न करायचे नाही. तर दुसऱ्या बाजुला बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच पुरुष लैंगिक सुखापासून वंचित राहत आहेत.”

भारताची फाळणी होण्याअगोदर म्हणजे १९४७ साली भारताची लोकसंख्या ४२ कोटी होती. आजच्या तारखेला भारताची लोकसंख्या ही १३५ कोटींच्या आसपास आहे. याचा अर्थ भारताच्या लोकसंख्येत ७४ वर्षात चौपट वाढ झालेली आहे. मात्र त्या तुलनेत रोजगाराची संख्या वाढलेली नाही. त्यातही दुर्दैवाची बाब अशी की २०२० मध्ये १२ कोटी लोकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. त्यामुळेच बलात्कारात वाढ होत नसेल का? असा प्रश्न काटजू यांनी उपस्थित केला आहे.

याच्यापुढे जाऊन काटजू म्हणतात की, जर आपल्याला खरंच बलात्कार थांबवायचे असतील तर आपल्याला बेरोजगारविरहीत किंवा कमी बेरोजगारी असलेली सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था उभारावी लागेल. काटजू यांच्या मताशी अनेकजणांनी असहमती दर्शवली आहे. याचा अर्थ ज्या पुरुषांची लग्न झालेली आहेत किंवा ज्यांना रोजगार आहे, ते बलात्कार करत नाहीत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. मात्र काटजूंनी आपल्या पोस्टमध्ये बलात्काराचे समर्थन करता येणार नाही, हे देखील ठळकपणे नमूद केले आहे.

First Published on: September 30, 2020 5:35 PM
Exit mobile version