कोरोना विषाणूनंतर आता आढळला नवा विषाणू; ही आहेत लक्षणे

कोरोना विषाणूनंतर आता आढळला नवा विषाणू; ही आहेत लक्षणे

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. वर्ष उलटूनही कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही आहे. कोरोनाचा कहर सुरु असताना आता नव्या विषाणूचा शोध लागला आहे. मानवाकडून मानवाला या विषाणूचा संसर्ग होतो. अमेरिकेतील आरोग्य विषयक संस्था असणाऱ्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनेही (सीडीसी) हा विषाणू सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बोलिव्हियामध्ये या विषाणूच्या संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत.

या विषाणूचा संसर्ग झाल्यास ताप येतो आणि हा ताप थेट मेंदूवर परिणाम करतो. या विषाणूमुळे ब्रेन हॅमरेजचा धोका अधिक असतो. हा विषाणू इबोलासारखाच आहे. इबोला हा विषाणूही संसर्ग होण्याच्या दृष्टीने खूपच धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यात यशही आले होते. दरम्यान, वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या विषाणूचे नाव चापरे विषाणू (Chapre Virus) असे आहे. हा विषाणू २००४ साली बोलिव्हियामध्ये चापरे भागात आढळूला होता. लाइव्ह सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार सीडीसीने सांगितले की, २०१९ साली या विषाणूचा संसर्ग पाच जणांना झाला होता. त्यापैकी तीन आरोग्य कर्मचारी होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला.

अहवालानुसार, जॉर्जटाऊन विद्यापीठातील संशोधक कॉलिन कार्लसन यांनी सांगितले की, इबोलासारखे थेट मेंदूवर परिणाम करणाऱ्या विषाणूचा संसर्ग करोना किंवा अन्य फ्लूच्या विषाणूंपेक्षा लवकर दिसून येतो. कारण रक्तस्त्राव तापाची लक्षणे सामान्यत: संसर्गानंतर लगेच दिसून येतात आणि संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्याने हे संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरते. हा विषाणू साथीच्या आजाराचे रुप घेतले आरोग्य व्यवस्था उन्मळून पडेल. या विषाणूच्या संक्रमित रुग्णांवर उपचार करताना बरेच आरोग्य कर्मचारी आजारी पडतात.

२०१९ मध्ये चापरे विषाणूचा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होत असल्याचे पहिल्यांदा आढळले. चापरेच्या रुग्णांचे नमुने गोळा करण्याऱ्या डॉक्टरांना वाटले की, ही रुग्ण डेंग्यूच्या रुग्णांच्या संपर्कात आले आहेत. सीडीसीच्या संशोधक मारिया मोराल्स यांनी “दक्षिण अमेरिकेमध्ये डेंग्यू हा सामान्य आजार आहे. रक्तस्त्राव तापाला कारणीभूत ठरणाऱ्या डेंग्यू शिवाय इतर गोष्टींचा इथे आधी विचार केला जात नाही. विशेष म्हणजे डेंग्यू आणि चापरे यांच्यात बऱ्याच प्रमाणात साधर्म्य आहे,” असे सांगितले.

सीडीसीमधील संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ कॅटलिन कोसाबूम यांनी सांगितले की, चापरेचा संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये ताप येणे, पोटात दुखणे, उलट्या, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर व्रण उठणे, डोळे चुरचुरणे अशी लक्षणे दिसून येतात. या विषाणूच्या संसर्गावर अद्याप कोणतेही ठोस उपचार सापडलेले नसून करोनाप्रमाणेच जमेल त्या पद्धतीने रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर उपचार करणे हाच सध्या एकमेव उपाय उपलब्ध आहेत.

 

First Published on: November 18, 2020 1:45 PM
Exit mobile version