पैशांच्या व्यवहारावरून वाद-विवाद; निवृत्त नौदल अधिकाऱ्याची हत्या

पैशांच्या व्यवहारावरून वाद-विवाद; निवृत्त नौदल अधिकाऱ्याची हत्या

दिल्लीच्या द्वारका भागात पैशाच्या व्यवहाराच्या वादात एका व्यक्तीने सेवानिवृत्त नौदल अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार मारले. आरोपीने अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर अगदी जवळून गोळी चालवली होती. गुरुवारी या संदर्भात माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सेवानिवृत्त अधिकारी रिअल इस्टेटच्या व्यवसायात असून, सेक्टर -२३, द्वारका येथील निवासी फ्लॅट खरेदीसाठी थकित पाच लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल आरोपीने ही घटना घडवून आणली आहे.

असा घडला प्रकार

द्वारकाचे पोलिस उपायुक्त म्हणाले की, ५५ वर्षीय बलराज देशवाल यांनी २०१९ मध्ये पोछनपुर खेड्यातील गेहलन एव्हेन्यू येथे एक फ्लॅट प्रदीप खोखर यांना ३९ लाखात विकला होता. ते म्हणाले की एकूण रकमेपैकी पाच लाख रुपयांचे देणे बाकी होते आणि देशवाल वारंवार खोखर यांच्याकडे थकबाकी मागत असल्याने त्याने त्यांना धमकावले. यावरूनच रविवारी सायंकाळी थकित रकमेबाबत देशवाल व खोखर यांच्यात वाद झाला. त्यावेळी खोखरने अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये देशवाल यांना गोळ्या घातल्या आणि कारमध्ये टाकून पसार झाला.

देशवाल यांना तातडीने व्यंकटेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिल्लीचे डीसीपी म्हणाले की, पोलिसांनी मंगळवारी द्वारका येथील सेक्टर -१९ मध्ये असलेल्या उद्यानातून आरोपी प्रदीप खोखरला अटक केली आणि त्याच्या ताब्यातून परवानाधारक पिस्तूल जप्त केली आहे.


हे ही वाचा- २०२१ च्या सुरूवातीला उपलब्ध होणार कोरोनाची लस; ‘या’ देशानं केला दावा

First Published on: September 25, 2020 2:24 PM
Exit mobile version