ऋषभ पंतची गाडी धडकली दुभाजकाला, कारने घेतला पेट; ऋषभ रुग्णलयात दाखल

ऋषभ पंतची गाडी धडकली दुभाजकाला, कारने घेतला पेट; ऋषभ रुग्णलयात दाखल

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याच्या गाडीला शुक्रवारी पहाटे मोठा अपघात झाला. रुरकी येथे ऋषभ पंतची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे भस्मसात झाली. कारची काच फोडून पंत यांना बाहेर काढले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी ऋषभ पंत परतत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास रुरकीच्या नारसन सीमेवर हम्मदपूरजवळ हा अपघात झाला. पंत याची मर्सिडीज गाडी (DL 10 CN 1717) सुसाट वेगात होती आणि दुभाजकाला आदळल्यानंतर रेलिंग तोडून गाडी पलीकडे गेली. वेग जास्त असल्याने सुमारे 200 मीटरवर जाऊन ही कार थांबली. त्यानंतर तिला आग लागली. ऋषभ पंत ज्या कारमधून घरी परतत होता, त्या गाडीचा नंबर प्लेट आहे.

काही प्रवाशांनी गाडीची पुढची काच फोडून गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही मार बसला आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा – ‘नैना’तील इमारतींच्या पुनर्विकासासाठी एफएसआय वाढवणार, उदय सामंत यांची मोठी घोषणा

सुरुवातीला पंतची प्रकृती चिंताजनक होती, पण हळूहळू त्याची प्रकृती सुधारली. यानंतर त्याला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्यावर प्लास्टिक सर्जरीही होणार आहे. सक्षम हॉस्पिटलचे डॉक्टर सुशील नागर यांनी सांगितले की, ऋषभ पंतचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्या कपाळावरही जखम आहे. कपाळावर काही टाके घालण्यात आले आहेत.

First Published on: December 30, 2022 10:56 AM
Exit mobile version