घ्या..रॉबर्ट वाड्रांना आता राजकारणात यायचंय!

घ्या..रॉबर्ट वाड्रांना आता राजकारणात यायचंय!

रॉबर्ट वाड्रा यांची फेसबुक पोस्ट

प्रियांका गांधी-वाड्रा यांनी अवघ्या महिन्याभरापूर्वीच उत्तर प्रदेश पूर्व विभागाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी देखील सक्रीय राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. रविवारी भल्या सकाळी त्यांनी एक भली मोठी फेसबुक पोस्ट टाकून त्यात शेवटी ‘मला लोकांची सेवा करण्यासाठी आता मोठी भूमिका बजावायची आहे’, असे सूतोवाच दिले आहेत. याविषयी जेव्हा प्रसारमाध्यमांनी विचारलं, तेव्हा ‘राजकारणात उतरल्यामुळे जर लोकसेवा होऊ शकत असेल, तर का नाही?’ अशी सूचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच प्रियांका गांधींसोबतच रॉबर्ट वाड्रा देखील भारतीय राजकारणात दिसण्याची दाट शक्यता आहे.

ईडीचा फेरा रॉबर्ट वाड्रांच्या मानेवर

सध्या रॉबर्ट वाड्रा हे पैशांची अफरातफर केल्याच्या प्रकरणात इडीच्या निशाण्यावर आहेत. त्यांची विविध ठिकाणी चौकशी देखील केली जात आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये झालेला कथित जमीर खरेदी घोटाळा आणि परदेशात मोठ्या प्रमाणावर त्यांच्या नावे असलेली बेहिशेबी मालमत्ता या प्रकरणी इडी त्यांची चौकशी करत आहे. १६ फेब्रुवारीला यासंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान रॉबर्ट वाड्रांचा अंतरिम जामीन २ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये इडीने रॉबर्ट वाड्रांच्या कार्यालयातून जी कागदपत्र ताब्यात घेतली आहेत, त्या कागदपत्रांची कॉपी मिळावी, अशी विनंती वाड्रांच्या वकिलाने विशेष न्यायालयासमोर केली आहे.


हेही वाचा – मोदींचा सामना राहुलशी, माझ्याशी नाही – प्रियांका गांधी

समाजकार्यांचा वाचला पाढा

आपल्या या फेसबुक पोस्टमध्ये रॉबर्ट वाड्रांनी अनेक मुद्दे मांडले आहेत. मग ते गेल्या दशकभरात देशातल्या विविध सरकारांनी त्यांना आत्तापर्यंत बदनाम करण्याचा केलेला प्रयत्न असो किंवा मूळ मुद्द्यांना बगल दिल्याचा आरोप असो. या फेसबुक पोस्टमध्ये वाड्रांनी अनेक दावे केले आहेत. शिवाय, कालांतराने लोकांना खरं काय ते समजेल, असा दावा देखील केला आहे. आपण गेल्या काही वर्षांमध्ये किती समाजकार्य केलं, याचा पाढाच रॉबर्ट वाड्रांनी या पोस्टमध्ये वाचला आहे. आणि शेवटी ‘असंच समाजकार्य करण्यासाठी आता मोठ्या भूमिकेत यावं लागेल’, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अर्थात, ही मोठी भूमिका म्हणजे नेमकी काय, हे रॉबर्ट वाड्रांनी त्या पोस्टमध्ये उघड केलं नाही.

मोठा बदल घडवायचाय…

याचा व्हायचा तो परिणाम झालाच. प्रसारमाध्यमांमध्ये या पोस्टची आणि रॉबर्ट वाड्रांच्या संभाव्य राजकीय प्रवेशाची चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर सीएनएन न्यूज १८ने विचारणा केल्यावर वाड्रांनी सूचक विधान केलं. ‘माझ्या विधानाचा अर्थ मी राजकारणात सक्रिय होईन असा नाही. पण जर राजकारणात आल्यामुळे जर मी मोठा बदल घडवून आणू शकणार असेन, तर का नाही?’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे आता त्यांच्या या पोस्टवर आणि त्यानंतरच्या प्रतिक्रियेवर चांगलीच चर्चा होणार आहे हे नक्की!

First Published on: February 24, 2019 11:49 AM
Exit mobile version