१ मार्चपासून १०० रूपये लिटर दराने होणार दूधाची विक्री; खाप पंचायतीचा निर्णय

१ मार्चपासून १०० रूपये लिटर दराने होणार दूधाची विक्री; खाप पंचायतीचा निर्णय

हरियाणाच्या हिसारमधून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयात १ मार्चपासून प्रति लिटर १०० रुपये दूध विक्री करण्यात येणार आहे. हा निर्णय हिसारमध्ये खाप पंचायतीकडून घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. खाप पंचायतीच्या या निर्णयानुसार, १ मार्चपासून दूध १०० रुपये प्रति लिटर या दराने विकले जाणार आहे. पंचायतीने हा निर्णय तेलाच्या वाढत्या किंमती आणि नव्या कृषीकायद्यांना विरोध म्हणून केला आहे. काल शनिवारी सोशल मीडियातील ट्विटरवरही दूध १०० रुपये प्रति लिटर दराने विकले जाणार यासंदर्भातील हॅशटॅग ट्रेंड करत होता तर सोशल मीडियावर या अजब निर्णयाची चर्चा सुरू आहे.

हा प्रकार हिसारच्या नारनौदशी संबंधित आहे, येथील देवराज धर्मशाळेतील सतरोल खाप यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. १ मार्चपासून दुधाची किंमत १०० रुपये प्रति लीटर विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सतरोल खापचे प्रमुख रामनिवास लोहान व प्रवक्ता फूल कुमार यांनी सांगितले की, हा निर्णय शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घेण्यात आला आहे. ते असेही म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे, मात्र सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आम्ही डेअरी आणि दूध केंद्रांना १०० रुपये प्रति लिटरच्या हिशोबाने दूध विकण्याचा निर्णय घेऊन तसे सांगितले आहे. पंचायतीने असेही स्पष्ट केले आहे की गरीबांना आपल्या आपल्यात दूध देण्यावर कोणतेही निर्बंध त्यांनी घातलेले नाहीत.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, सतरोल खाप हा एक मोठा समाज असून यापूर्वीही त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनेक निर्णय घेतले आहेत. माजरा पयाऊ गावात ३ मार्च रोजी सतरोल खापतर्फे युवा परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. ‘आम्ही १०० रु. / लिटर या किंमतीने दूध देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही डेअरी शेतकऱ्यांना आग्रह करतो की त्यांनी सरकारच्या सहकारी समित्यांना याच किंमतीने दूध विकावे.’, असेही पंचायतीकडून सांगण्यात येत आहे. तर सिंघू सीमेवर चालू असलेल्या आंदोलनातील एका नेत्याने म्हटले आहे की जर सरकार तेलाच्या किंमती १०० रुपयांपर्यंत नेऊ शकते तर त्याचे उत्तर ते दुधाच्या किंमती वाढवून देतील.

First Published on: February 28, 2021 12:09 PM
Exit mobile version