भारताप्रमाणे पाकिस्तानलाही हवं होतं स्वस्तात तेल; पण रशियाने दिला झटका

भारताप्रमाणे पाकिस्तानलाही हवं होतं स्वस्तात तेल; पण रशियाने दिला झटका

भारताप्रमाणेच कच्च्या तेलात सवलतीच्या अपेक्षेने रशियाला गेलेल्या पाकिस्तानी शिष्टमंडळाला मोठा झटका बसला आहे. रशियाने पाकिस्तानला कच्च्या तेलावर 30-40 टक्के सूट देण्यास नकार दिला आहे. अशी सवलत दिली जाणार नाही, असे रशियाने स्पष्टपणे सांगितले, त्यानंतर पाकिस्तानी शिष्टमंडळाला रिकाम्या हाताने परतावे लागले. (Russia Refuses To Give Pakistan 30 40 Percent Discount On Crude Oil)

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ 29 नोव्हेंबरला रशियाला गेले होते. या शिष्टमंडळाने 30 नोव्हेंबर रोजी रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि स्वस्त तेलाची विनंती केली. त्यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनाही भारताप्रमाणेच तेलाच्या किमतीवर ३० ते ४० टक्के सूट देण्यात यावी. रशियन अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले पण त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही.

रशिया प्रथम विश्वासार्ह आणि मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या मोठ्या ग्राहक देशांना कच्चे तेल देऊ शकते. रशियन अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी शिष्टमंडळाला सांगितले की, सध्या सर्व खंड मोठ्या खरेदीदारांसोबत बांधील आहेत. पुढे विचार करू पण सध्या ते शक्य नाही. रशियन बाजूने पाकिस्तानला ताकीद दिली, की कराची ते लाहोर, पंजाब या पाकिस्तान स्ट्रीम गॅस पाईपलाईनच्या फ्लॅगशिप प्रकल्पाप्रती आपली वचनबद्धता प्रथम मानावी.

यापूर्वी 13 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार म्हणाले होते की, अमेरिका पाकिस्तानला रशियन तेल खरेदी करण्यापासून रोखू शकत नाही आणि ते लवकरच शक्य होईल. दुबईमध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही टिप्पणी केली.

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना दार यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली ज्यामध्ये रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावर चर्चा झाली. पाकिस्तानी मंत्री म्हणाले की, मंत्रालय रशियाकडून समान अटींवर तेल खरेदी करण्याचा प्रयत्न करेल.


हेही वाचा – रात्री घराबाहेर पडू नका; दक्षिण कोरियाकडून भारतातील नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

First Published on: December 2, 2022 10:38 AM
Exit mobile version