Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर सर्जिकल स्ट्राईक ; दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच केलं मोठं धाडस

Russia Ukraine War : युक्रेनचा रशियावर सर्जिकल स्ट्राईक ; दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच केलं मोठं धाडस

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील काही दिवसांपासून तणावाचं वातावरण सुरू आहे. जवळपास दोन्ही देशातील युद्धाला ३७ दिवस पुर्ण झाले आहेत. युक्रेनकडूनही पहिल्या दिवसापासून रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. परंतु आता युक्रेनने रशियावर सर्जिकल स्ट्राईक केलं असून दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढं मोठं धाडस केलं आहे. या हल्ल्यात रशियातील ऑईल डेपो उद्धस्त झाल्याचे समजते.

रशिया-युक्रेन सीमेपासून ४० किलोमीटर अंतरावरील बेलगोरोडजवळील ऑईल डेपोला मोठी आग लागली आहे. या घटनेचे काही व्हि़डीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. पण याबाबत युक्रेनकडून कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. पण रशियाने हा दावा केला आहे. युध्द सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच युक्रेननं थेट रशियात घुसून हल्ला केल्यानं दोन्ही देशांतील संघर्ष आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टरने केलेल्या एअरस्ट्राईकमुळे ऑईल डेपोला आग लागली. मात्र, या हल्लामध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाहीये, असं स्पष्टीकरण गव्हर्नर ग्लॅडकोव्ह यांनी दिलं आहे. आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिसरातील नागरिकांना कोणाताही धोका नाही, असंही त्यांनी सांगितले.

ऑईल डेपोच्या परिसरातील काही नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. या घटनेत दोघे जखमी झाले आहे. या हल्ल्यामुळे इंधनाच्या आठ टाक्यांना आग लागली आहे. जवळपास २०० जवान ही आग विझवत आहेत. ऑईल डेपोला आग लागल्यानंतर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत १५३ लहान मुलांचा मृत्यू झाला असून २४५ हून अधिक मुलं जखमी झाली आहेत. त्याचप्रमाणे शेकडो नागरिकांचाही मृत्यू झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे.


हेही वाचा : नाना पटोलेंचे वकील सतीश उकेंवर मूळ कारवाई नागपूर पोलिसांची, फडणवीसांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया


 

First Published on: April 1, 2022 4:26 PM
Exit mobile version