साध्वी प्रज्ञासिंह यांच्या पुन्हा कोलांटउड्या! नथुराम गोडसे प्रकरणी यूटर्न!

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या पुन्हा कोलांटउड्या! नथुराम गोडसे प्रकरणी यूटर्न!

'हेमंत करकरे काहींसाठी देशभक्त असतील, प्रज्ञा सिंह यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

साध्वी प्रज्ञा सिंह आणि वाद हे जणूकाही समीकरणच झाल्याचं गेल्या काही दिवसांमधल्या घटनांमधून समोर आलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटांमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी जामिनावर बाहेर येताच या प्रकरणाचा तपास करणारे आणि मुंबई हल्ल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. तेव्हा मोठा वाद निर्माण होऊन साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना भाजपने उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देखील देण्यात आली. तेव्हाही मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा साध्वींनी केलेल्या वक्तव्यावरून आधी वाद आणि नंतर त्यांचा घुमजाव अशी परिस्थिती ओढवली आहे. यामुळे भाजपवर मात्र साध्वींच्या वक्तव्यापासून फारकत घेण्याची वेळ आली.

वैयक्तिक मत आणि पक्षाचं मत!

गुरुवारी सकाळी साध्वी प्रज्ञासिंह यांना एका दौऱ्यादरम्यान पत्रकाराने सध्या सुरू असलेल्या नथुराम गोडसे वादाविषयी विचारणा केली. मात्र, ‘नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील’, असं म्हणत साध्वींनी वादाची राळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपवर देखील टीका होऊ लागली. सोशल मीडियावर साध्वी प्रज्ञासिंह यांना टार्गेट करण्यात आलं. अखेर, भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांनी ‘प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यांशी भाजप सहमत नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे’, असं जाहीर करत हात झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच, साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याकडून स्पष्टीकरण घेण्याचीही तयारी दाखवली.

साध्वींचं वरातीमागून घोडं…

दरम्यान, आपली चूक झाल्याचं लक्षात येताच साध्वी प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एकदा घुमजाव केलं. दुपारी नथुराम गोडसेचं समर्थन करणाऱ्या साध्वींना संध्याकाळपर्यंत नथुराम गोडसे मारेकरीच असल्याचा साक्षात्कार झाला. ‘मी भाजपची निष्ठावान कार्यकर्ती आहे. त्यामुळे पक्षाची जी भूमिका असेल, तीच माझीही भूमिका असेल’, असं साध्वींनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्पष्ट केलं. साध्वींच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी देशाची माफी मागण्याचीही मागणी त्यांनी केली होती.


वाचा काय म्हणाल्या होत्या साध्वी – करकरेंना देशद्रोही म्हणणाऱ्या साध्वी नथुरामला म्हणाल्या देशभक्त!

हेमंत करकरेंबद्दलचं वक्तव्य भोवलं

याआधी ‘हेमंत करकरे आपल्या कर्मानं मेले, त्यांना माझा शाप लागला’, अशा आशयाचं विधान करून साध्वी प्रज्ञा सिंह यांनी वादाचा धुरळा उडवून दिला होता. त्यानंतर देखील आपल्या वक्तव्याचा फक्त खेद व्यक्त करून ‘माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मी माफी मागते, पण मी माझ्या भावना व्यक्त केल्या’, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर आधीच मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. त्यातच आता या नव्या वादाची भर पडली आहे.

First Published on: May 16, 2019 9:22 PM
Exit mobile version