संदेसारा घोटाळा प्रकरण: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची ईडीकडून चौकशी

संदेसारा घोटाळा प्रकरण: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची ईडीकडून चौकशी

संदेसारा घोटाळा प्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) दल आज त्यांच्या निवासस्थानी पोहोचलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. याआधी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ज्येष्ठ नागरिक आणि कोरोनाच्या गाईडलाईन्समुळे चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचं सांगत अहमद पटेल चौकशीसाठी गेले नव्हते. दरम्यान, आज ईडीची तीन सदस्यांची एक टीम २३, मदर टेरेसा क्रिसेंट या अहमद पटेल यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी गेली असून त्यांची चौकशी करत आहे. संदेसारा बंधुंशी संबंध आहेत का? याबाबत ईडी चौकशी करत आहे.

सीबीआयने ऑक्टोबर २०१७ मध्ये कंपनी आणि प्रवर्तकांविरूद्ध ५ हजार ३८३ कोटी रूपयांच्या बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर, ईडीनेदेखील खटला दाखल केला. ईडीच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम त्यापेक्षाही अधिक असल्याचं समोर आलं होतं. संदेसारा बांधवांनी नीरव मोदीपेक्षा जास्त घोटाळा केला आहे, असा दावा ईडीने केला आहे.

संदेसारा समुहाने शेल कंपनीच्या सहाय्याने भारतीय बँकांच्या परदेशातील शाखांमधून ९ हजार कोटी रूपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले होते. तसेच स्टर्लिंग बायोटेक लिमिटेडने भारतीय बँकांकडून भारतीय आणि परदेशी चलनातही कर्ज घेतलं होतं. संदेसारा समुहाने आंध्रा बँक, यूको बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाकडून ही कर्ज घेतलं होतं. ऑक्टोबर २०१७ मध्ये संदेसारा समुहावर सीबीआयने एफआयआर दाखल केल्या नंतर इडीनेही त्यांच्यावर खटला दाखल केला होता.

 

First Published on: June 27, 2020 4:22 PM
Exit mobile version