पाकिस्तानमधील बॅनरवर झळकले संजय राऊत

पाकिस्तानमधील बॅनरवर झळकले संजय राऊत

संजय राऊत…शिवसेना नेते आणि खासदार…नेहमीच संजय राऊत काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. संजय राऊत यांच्या वक्तव्याची नेहमीच राज्यात चर्चा असते. कधी ते विरोधकांवर आपल्या स्टाइलने तोफ डागतात तर कधी सत्ताधाऱ्यांवर. मात्र आता याच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाची चर्चा सध्या इस्लामाबादमध्ये सुरू आहे. त्याचे कारणही तसेच आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भाषण केले होते. ‘आज जम्मू काश्मीर घेतले आहे, उद्या बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरही घेऊ’, अशी गर्जना त्यांनी राज्यसभेत केली. ‘देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करतील, असा मला विश्वास आहे’, असे देखील संजय राऊत म्हणाले होते. यानंतर त्यांच्या या भाषणानंतर इस्लामाबादमध्ये ‘महाभारत – स्टेप फॉरवर्ड’ असे लिहिलेली पोस्टर्स लागली असून, यामध्ये संजय राऊत यांचे नाव आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून, यामुळे सध्या राज्यातसह पाकिस्तानमध्येही चर्चा सुरू झाली आहे.

कोणी टाकलाय ‘हा’ व्हिडिओ?

पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या साजिद नावाच्या तरुणाने हा पोस्टर दाखवणारा व्हिडिओ ट्वीट केला असून, आपल्या देशात भारतातले लोक अशा पद्धतीची पोस्टर्स लावत आहेत आणि आपण काय करत आहोत, असा सवाल त्याने विचारला आहे. इस्लामाबादमध्ये जागोजागी अशी पोस्टर्स कशी काय लागू शकतात, असाही त्याचा सवाल आहे.

पाकिस्तानमध्ये माझा जरी पोस्टर लागला असला तरी तो शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा पोश्टर आहे. हा फक्त माझा पोश्टर नाही तर शिवसनेच्या विचारांचा पोश्टर आहे. शिवसेनेचे विचार आता सगळ्यांना पटू लागले आहेत.
– संजय राऊत, शिवसेना खासदार

हेही वाचा – काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव लोकसभेतही मंजूर

First Published on: August 6, 2019 8:20 PM
Exit mobile version