‘LGBTQ’ समुहाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या महिला टाईम मासिकाच्या यादीत

‘LGBTQ’ समुहाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या महिला टाईम मासिकाच्या यादीत

अमेरिकेतील प्रसिद्ध टाईम मासिकातर्फे दरवर्षी जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर करण्यात येते. त्यानुसार यावेळी, टाईम मासिकाने संपुर्ण जगातील प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या टाईम मासिकाने प्रसिद्ध केलेल्या प्रतिष्ठेच्या जगभरातील १०० प्रभावशाली व्यक्‍तींच्या यादीमध्ये रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासह समलैंगिक संबंधांबाबतची कायदेशीर लढाई लढविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मेनका गुरुस्वामी तसेच जनहित याचिका कार्यकर्त्या अरुंधती काटजू यांना स्थान देण्यात आले आहे.

या प्रसिद्ध व्यक्‍तींचा समावेश

ही टाईम मासिकाची यादी २०१९ ची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. या प्रसिद्ध करण्याच आलेल्या यादीमध्ये जगातील नेते, बुद्धीमान, कलाकार आणि वर्षातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्‍तींना समाविष्ट करण्यात आले आहे. या यादीमध्ये भारतीय वंशाचे अमेरिकन विनोदी कलाकार आणि टिव्ही निवेदक हसन मिन्हाज, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पोप फ्रान्सिस, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, गोल्फपटू टायगर वुडस आणि फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा समावेश आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राचे गौरवोद्‌गार 

अरुंधती काटजू आणि मनेका गुरुस्वामी यांच्याबद्दल अभिनेत्री प्रियांका चोप्राने त्यांचे अभिनंदन करत असे म्हटले, ”या दोघींनी भारतामध्ये समलैंगिक समुहाच्या समानतेच्या हक्कांसाठी संघर्ष केला. ‘LGBTQ’ समुहाला लोकशाही हक्क मिळावा यासाठी या दोघींनी उचललेले पाऊल उल्लेखनीय आहे. कायदा जरी बदलला तरी समाजाने प्रगतीशील राहिले पाहिजे. समजून, स्वीकारून आणि प्रेमाने बदल घडवला पाहिजे, हे या दोघींनी दाखवून दिले.” तसेच, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे घटनेतील ३७७ वे कलम घटनाबाह्य ठरवले होते. ब्रिटीश वसाहतकाळातील १५७ वर्षांपूर्वीचा हा कायद्यात बदल करून सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिल्याचे प्रियांका चोप्राने म्हटले आहे.

महिंद्राच्या अध्यक्षांनी अंबानींचा दिला परिचय

मुकेश अंबानी यांच्याबाबत महिंद्रा समुहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी विशेष परिचय लिहीला असून यावेळी, महिंद्रा यांनी असे म्हटले, ”धीरुभाई अंबानी हे दूरदृष्टी असलेले उद्योजक होते. त्यांच्या रिलायन्स उद्योगाने जागतिक पातळीवर व्यवसाय नेऊन ठेवला. तर मुकेश अंबानी यांनी आपल्या वडिलांच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात उद्योग सुरू केला. रिलायन्स जिओ मोबाईल नेटवर्कने आतापर्यंत २८० दशलक्ष लोकांपर्यंत स्वस्तात 4G सेवा दिली आहे. जगभरात प्रत्येकाच्या हाती इंटरनेट देण्याचे रिलायन्सचे लक्ष्य दूर नाही.”

यासोबतच, अमेरिकेची खुली टेनिस स्पर्धा जिंकणारी खेळाडू नाओमी ओसाका, अभिनेता महेरशला अली, ऑस्कर विजेता कलाकार रामी मालेक, माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा, ऑस्कर विजेती गायिका आणि अभिनेत्री लेडी गागा, आबुधाबीचे युवराज मोहमद बिन झ्यायेद, विशेष वकिल रॉबर्ट मुलर आणि अमेरिकेच्या संसदेतील सभापती नॅन्सी पेलोसी यांचाही टाईमच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

First Published on: April 18, 2019 11:20 AM
Exit mobile version