काँग्रेसचा अजून एक नेता झाला आझाद, एका बड्या नेत्यांचा राजीनामा

काँग्रेसचा अजून एक नेता झाला आझाद, एका बड्या नेत्यांचा राजीनामा

नवी दिल्ली – काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे. तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी राहुल गांधींवर टीका करत पक्षाचा राजीनामा दिला आहे. नुकताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न अपस्थित केले होते.

पक्ष सोडताना तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार एम. ए. खान यांनी गुलाम नबी आझाद यांनी मांडलेल्या मुद्द्यांचाच पुनरुच्चार केला आहे. राहुल गांधींची एक वेगळीच विचारसरणी असून ती पक्षाच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांनी जुळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 म्हणून काँग्रेसची वाताहत –

यावेळी राहुल गांधींच्या धोरणांचा परिणाम म्हणून काँग्रेसची वाताहत झाली. पक्ष अशा पातळीला येऊन पोहोचला आहे. जिथे गेली अनेक दशके पक्ष उभारणीचे काम केलेले ज्येष्ठ नेतेच पक्षाला सोडून जात आहेत. ज्येष्ठांशी कसे वागायचे, हे राहुल गांधींना माहिती नाही, अशी घणाघाती टीका खान यांनी केली. राहुल गांधींनी पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा कारभार सांभाळल्यापासून परिस्थिती अधिकच खराब होत गेली आहे. राहुल गांधींकडे त्यांची अशी एक वेगळीच विचारसरणी आहे. पण ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही, अशी टीकाही खान यांनी केली आहे.

गुलाम नबी आझाद यांचा दावा –

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून नवीन पक्ष काढणार असल्याची त्यानी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर  जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर आधी असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली. पक्षाच्या अनुभवी नेत्यांना बाजूला सारुन कोणताही अनुभव नसणारे पक्षाचे कामकाज चालवू लागले. राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांसमोर सरकारी अध्यादेश फाडला हे फारच बालिशपणाचे होते. २०१४ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवात याचा मोठा वाटा होता, असा दावा गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

First Published on: August 28, 2022 4:04 PM
Exit mobile version