अजनाळा हल्ल्यातील अमृतपालच्या सात साथीदारांना अटक, पंजाबमध्ये अटकसत्र सुरूच

अजनाळा हल्ल्यातील अमृतपालच्या सात साथीदारांना अटक, पंजाबमध्ये अटकसत्र सुरूच

नवी दिल्ली : अजनाळा हल्ल्याप्रकरणी अमृतपाल सिंगच्या सात साथीदारांना अटक करण्यात आली आहे. कट्टरपंथी अमृतपाल सिंग आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी नवीन तक्रार दाखल करण्यात आली असून शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आल्याचे अमृतसरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सतींदर सिंग यांनी सांगितले.

सतींदर सिंग म्हणाले की, आम्ही शनिवारी रात्री शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत नवीन तक्रार दाखल केली आहे. यामध्ये अमृतपाल हा मुख्य आरोपी असून नवीन तक्रारीनुसार त्याचे सातही साथीदार आरोपी आहेत. पोलिसांनी शनिवारी अमृतपालवर मोठी कारवाई करताना त्यांच्या संघटनेच्या 78 सदस्यांनाही अटक केली होती. या प्रकरणात अमृतपाल अजूनही फरार आहे.

हेही वाचा – बहीण-भाऊ गेली वीस वर्षे एकाच खोलीत कैद, नातेवाईकांनीही सोडली साथ…

23 फेब्रुवारीला झालेल्या अजनाळा घटनेप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार अमृतपालच्या साथीदारांपैकी सात साथीदारांना शनिवारी संध्याकाळी जालंधरमधील मेहतपूरजवळ अटक करण्यात आली. अजयपाल, गुरवीर सिंग, बलजिंदर सिंग, हरमिंदर सिंग, गुरलाल सिंग, सुवीरित सिंग आणि अमनदीप सिंग अशी त्यांची नावे असल्याचे एसएसपीने सांगितले. या आरोपींकडून सहा अवैध 12 बोअरच्या बंदुका आणि 193 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यापैकी हरमिंदर सिंगकडे एक बंदुक आणि 139 काडतुसेसह जप्त करण्यात आली. त्याची चौकशी केली असता अमृतपालने गुरबेज नावाच्या व्यक्तीकडून ही काडतुसे मिळवली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

कारवाई कशी करावी हा आमचा अंतर्गत विषय
अजनाळा प्रकरणात तक्रार नोंदवण्यास उशीर झाल्याच्या प्रश्नावर एसएसपी म्हणाले की, तक्रार दुसऱ्याच दिवशी नोंदवण्यात आली होती. त्यामुळे आम्ही कारवाई कशी करायची हा आमचा अंतर्गत विषय आहे. पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात असून शांततापूर्ण असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. अफवांवर लक्ष देऊ नका असे आवाहनही सतींदर सिंग यांनी जनतेला केले आहे. त्यांनी सांगितले की, कारवाईचा एक भाग म्हणून अमृतपालच्या मूळ गावातील घराचीही झडती घेण्यात आली आहे.

 

First Published on: March 19, 2023 6:01 PM
Exit mobile version