‘तर काँग्रेस झिरो होऊन जाईल’, काँग्रेस नेते शशी थरूर यांचं वक्तव्य!

‘तर काँग्रेस झिरो होऊन जाईल’, काँग्रेस नेते शशी थरूर यांचं वक्तव्य!

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मंदिरात जाण्यावरून काँग्रेसवर धर्मनिरपेक्षता सोडून भाजपच्या हिंदुत्वाचं दुसरं रुप स्वीकारल्याचा आरोप होऊ लागला होता. मात्र, यासंदर्भात जेव्हा पत्रकारांनी काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना विचारणा केली, तेव्हा मात्र, त्यांनी प्रश्नाला उत्तर देतानाच थेट काँग्रेसलाच छुपा इशारा दिला की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. ‘मी बऱ्याच काळापासून सांगत आलो आहे की पेप्सी लाईटचं अनुकरण करता करता भाजपा लाईट बनण्याचा प्रयत्न काँग्रेसने करू नये. नाहीतर कोक झिरोप्रमाणेच काँग्रेस देखील झिरो होऊन जाईल’, असं शशी थरूर म्हणाले आहेत. ‘काँग्रेस कोणत्याही प्रकारे किंवा संदर्भात भाजपसारखा नाही. अशा कमकुवत प्रकाराचं अनुकरण करण्याचा आम्ही प्रयत्नही करत नाही आहोत’, असं देखील शशी थरूर म्हणाले.

काँग्रेससाठी हिंदुवाद आणि हिंदुत्वात फरक!

दरम्यान, यावेळी बोलताना काँग्रेससाठी हिंदुत्व आणि हिंदुवात यात फरक असल्याचं देखील शशी थरूर यांनी म्हटलं आहे. ‘काँग्रेस पक्षात हे स्पष्ट आहे की आम्ही स्वत:ला भाजपचं दुसरं रुप बनू देऊ शकत नाही. काँग्रेस हिंदुवाद आणि हिंदुत्व यात फरक करतो. आम्ही सन्मान करत असलेला हिंदुवाद सर्वसमावेशक आहे. पण हिंदुत्व राजकीय तत्व आहे जे भेदभाव करण्यावर आधारित आहे. राहुल गांधींनी हे अनेकदा स्पष्ट केलं आहे की मंदिरात जाणं हे त्यांचं वैयक्तिक हिंदुत्व आहे. ते हिंदुत्वाच्या आक्रमक किंवा सामान्य अशा कोणत्याही स्वरूपाचं समर्थन करत नाहीत’, असं देखील थरूर म्हणाले.

First Published on: November 1, 2020 5:40 PM
Exit mobile version