वाराणसीत नाल्याशेजारी शेकडो शिवलिंग फेकले; भाजपवर टीकेची झोड

वाराणसीत नाल्याशेजारी शेकडो शिवलिंग फेकले; भाजपवर टीकेची झोड

नाल्याशेजारी शिवलिंग फेकले

उत्तर प्रदेशच्या वाराणसीत काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या बांधकामाचे काम सुरु आहे. त्या दरम्यान शेकडो शिवलिंग नाल्याच्या शेजारी फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉरिडोरसाठी उत्खनन सुरू असताना शिवलिंग सापडले ते नाल्याच्या शेजारी फेकून देण्यात आले. बुधवारी सकाळी नाल्याच्या शेजारी शिवलिंग फेकल्याची बातमी कळताच स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली. त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याचा एक व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यानंतर सपा, बसपा, काँग्रेससह अनेक पक्षाचे आणि धार्मिक संघटनेचे कार्यकर्त्यांनी सध्या भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान महिलांनी देखील सरकारच्या प्रति रोष व्यक्त केला आहे.

घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी बनारसमध्ये असि नाल्याच्या शेजारील परिसर शिवलिंगांनी भरलेला पहायला मिळाला. याची माहिती मिळताच स्तानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शिवलिंग आपल्या घरी घेऊन जायला लागले. हे कळताच शहर एडीएम विनय सिह आणि शहर एसपी दिनेश सिंह पोलीस टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ताबडतोब शिवलिंगाला त्याठिकाणावरु हटवले. घटनास्थळी नागरिकांची गर्दी पाहता मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

दोषींविरोधात कारवाई होणार

याची माहिती मिळताच काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. काँग्रेसचे माजी आमदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून लोकसभा निवडणुक लढणारे अजय राय यांनी लोकांची माहिती ऐकूण याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. नाल्याच्या शेजारी मोठ्या संख्येने शिवलिंग आले कुठून, कोणी आणून टाकले याचा तपास सुरु आहे. दोषींच्याविरोधात कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.

जनता मुख्यमंत्र्यांना माफ करणार नाही

दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार अजय राय यांनी याप्रकरणावरुन भाजपवर जोरदार टीका केली. धर्माच्या नावावर बनलेल्या सरकारचा खरा चेहरा जनते समोर आला. धर्माच्या नावावर वोट मागणाऱ्या सरकारने शिवलिंग नाल्याच्या शेजारी फेकले यापेक्षा दु:ख काय असू शकते. जनता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथला माफ नाही अशी टीका अजय राय यांनी केली आहे.

मंदिरांचा नाश करणे हा गंभीर गुन्हा

दुसरीकडे मंदिर बचाओ अभियानाचे प्रमुख स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘हे सरकार विश्वनाथ कॉरिडोरसाठी प्राचीन मंदिरांना नष्ट करण्याचे काम करत आहे. आधी मला याबाबत शंका होती. मात्र, आता हा प्रकार पाहून खात्री झाली आहे. हे धार्मिक प्रकरण असून मंदिरांचा नाश करणे हा गंभीर गुन्हा आहे. यासाठी कोणालाही माफ करता येणार नाही”, असे अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे.

First Published on: December 20, 2018 3:58 PM
Exit mobile version