‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे कडव शिवसेनेसाठीच – संजय राऊत

‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे कडव शिवसेनेसाठीच – संजय राऊत

शिवसेना हा राजकीय पक्ष अवघ्या पाच सहा महिन्यात बंद होईल अशी खिल्ली शिवसेनेच्या पक्ष स्थापनेनंतर उडविण्यात आली होती. पण आज शिवसेनेने ५५ वर्षांपर्यंत मजल मारली आहे. राष्ट्रीय राजकारणात एक महत्वाचे असे स्थान शिवसेनेने राजकीय पक्ष म्हणून मिळवले आहे. येत्या दिवसांमध्ये राष्ट्रीय राजकारणात शिवसेना अधिक चमकदार कामगिरी करणार असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होईल असेही ते म्हणाले. आजही शिवसेना ज्या पद्धतीने पुढे जात आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवरच मार्गक्रमण करत आहे. नुसती महाराष्ट्रापुरती शिवसेना मर्यादित राहिली नसून देशाच्या राजकारणात शिवसेनेचे एक महत्वाचे असे स्थान निर्माण झाले आहे. म्हणूनच की काय दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे वाक्य शिवसेनेसाठीच लिहिले गेले असावे असेही राऊत यावेळी म्हणाले.

मराठी माणसाला आजही शिवसेनेचा आधार वाटतो. मराठीच्या मुद्द्यासोबतच देशाच्या राजकारणात शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका कायम ठेवली. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचा प्रभाव आहेच, पण राष्ट्रीय राजकारणातही चमक दाखवण्यासाठी शिवसेना सज्ज आहे. केंद्रात सत्तेत असो वा नसो, शिवसेनेचा आवाज नेहमीच बुलंद राहिला. हिंदुत्वापासून अनेक मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका काय हे नेहमीच महत्वाचे ठरले आहे. म्हणूनच राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेना काय भूमिका घेते हे महत्वाचे ठरत आले आहे. शिवसेना सामनात काय लिहिते यावरही सगळ्यांचे लक्ष लागून असते.

शिवसेनेनंतर आलेले अनेक राजकीय पक्ष हे कालांतराने नामशेष झाले. पण आज शिवसेनेला ५५ वर्षे पुर्ण झाली आहेत. शिवसेना पक्ष हा एक चमत्कारच असल्याचेही संजय राऊत यावेळी म्हणाले. मराठी लोकांवर होणारा अन्याय निवारणाची भूमिका घेऊन सुरू झालेला एक छोटाशा पक्ष फार काळ टिकणार नाही असे अनेकांचे सुरूवातीला मत होते. तर अनेकांनी शिवसेना ही मुंबई महापालिकेच्या पुढे जाणार नाही, पाच सहा महिन्यातच बंद होईल अशीही टीका केली होती. आज शिवसेना ५५ वर्षांची होतानाच महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेला महत्व आहे. शिवसेनेच्या विचारधारेला महत्व असल्याचेही राऊत म्हणाले.


 

First Published on: June 19, 2021 10:49 AM
Exit mobile version