महिला कमांडो उभ्या केल्या हा कुठला नामर्दपणा? मार्शलवरुन राऊतांचा घणाघात

महिला कमांडो उभ्या केल्या हा कुठला नामर्दपणा? मार्शलवरुन राऊतांचा घणाघात

राज्यसभेत सुरु असलेला गोंधळ रोखण्यासाठी बुधवारी राज्यसभेत महिला कमांडोज बोलावण्यात आले होते. यावरुन विरोधकांनी टीकास्त्र डागलं असून शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदारांना आवर घालण्यासाठी महिला कमांडो उभ्या केल्या, हा कसला नामर्दपणा? अशा शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

सभागृहात मार्शल बोलावणं ही काही नवी गोष्ट नाही. पण एखादी दंगल आटोक्यात येत नाही म्हणून सैन्य बोलवावं अशा पद्धतीने मार्शल सभागृहात बोलावले. तिकडे चीन घुसखोरी करते तिथे नाही ही खबरदारी. तो नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग तो अशा महिला कमांडोज घेऊन फिरतो. काल संसदेतही आम्ही पुढे जाऊ नये म्हणून हे कमांडोज आणले. महिलांना आमच्यासमोर उभे करता ही कोणती मर्दानगी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

रुल बुक फेकले याचा अर्थ सरकारने नियमांचं पालन केलं नाही

राज्यसभेत रुल बुक फेकले असेल तर याचा अर्थ सरकारने नियमांचं पालन केलं नाही. रुल बुक वाचा आणि संसदेचं कामकाज चालवा यासाठी प्रताप बाजवा यांनी रुल बुक फेकलं. कारण नियमानुसार काम चालत नव्हतं. काल पाच साडेपाच वाजता घटना दुरुस्ती बिलावर उत्तम प्रकारे आणि शांतपणे चर्चा सुरू होती. सहमतीने चर्चा सुरू होती. बहुमताने बिल मंजूर करून घेतलं. संपूर्ण विरोधी पक्षाने सहकार्य केलं. पण जे विमा संदर्भातील बिल आहे. विमा कंपन्यांचं खासगीकरण करण्याचा त्याला विरोध आहे. देशभरातून विरोध आहे. ते आज न आणता उद्या आणावं असं काल सकाळी ठरलं होतं. या विधेयकावर उद्या चर्चा करण्यावर सहमतीही झाली. जेव्हा एसईबीसी विधेयक मंजूर झालं. तेव्हा लगेच या विधेयकावर कारवाईला सुरुवात झाली. त्यावर सर्व विरोधक उठले. शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगेही उठले. त्यांनी विरोध केला. पण सभागृह नेते पीयूष गोयल आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे बिल रेटण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला त्यातून भडका उडाला. सरकारने ठिणगी टाकण्याचं काम केलं, असा दावा त्यांनी केला.

 

First Published on: August 12, 2021 11:23 AM
Exit mobile version