ममता बॅनर्जी-शरद पवार भेट; राऊत म्हणतात, काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही

ममता बॅनर्जी-शरद पवार भेट; राऊत म्हणतात, काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. पवार-बॅनर्जी भेटीत विरोधकांचा समर्थ पर्याय उभा राहू शकतो का? याची चर्चा होईल. मात्र, काँग्रेसशिवाय एकजूट शक्य नाही, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट होणार असल्याचं सांगितलं. भेटीगाठी व्हायला पाहिजेत. त्यातून संवाद घडतो, चर्चा होते. एक समर्थ पर्याय उभा राहू शकतो का? यातून काही निर्माण होईल का? विरोधकांच्या ऐक्यावरती एकजूट होईल का? याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटल्या. यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केलं. ममता बॅनर्जी सोनिया गांधी यांना भेटल्या हे चांगलं लक्षण आहे. कारण विरोधी पक्षाची एकजूट ही काँग्रेसशिवाय संपूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांना भेटलं पाहिजे आणि एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.

ममता बॅनर्जी यांची पंतप्रधानांशी चर्चा 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा असून त्यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. कोरोनासंदर्भातील लस, औषधे आदी विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं ममता बॅनर्जी यांनी बैठकीनंतर सांगितलं. ‘पेगॅसस’प्रकरणी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी व सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली.

First Published on: July 28, 2021 11:32 AM
Exit mobile version