काय तो वाहता ओढा, काय तो पूर; शहाजीबापूंच्या मतदारसंघात विद्यार्थ्यांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास

काय तो वाहता ओढा, काय तो पूर; शहाजीबापूंच्या मतदारसंघात विद्यार्थ्यांचा पाण्यातून जीवघेणा प्रवास

राज्याच्या राजकारणातील सत्तापरिवर्तनात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील प्रसिद्धी झोतात आले. गुवाहाटीमध्ये असताना काय झाडी, काय डोंगर, काय हाटील या त्यांच्या डायलॉगची देशभर चर्चा झाली. ज्यामुळे शहाजीबापू पाटील हा अनेकांसाठी ओळखीचा चेहरा झाले आहेत. एकीकडे शहाजीबापूंच्या डायलॉगची चर्चा होतेय तर दुसरीकडे आता त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी, प्रश्न समोर येत आहेत. यावरून विरोधकांनी शहाजीबापू भाषणबाजी करण्यापेक्षा मतदारसंघातील प्रश्नांकडे लक्ष द्या अशी टीका होत आहे.

तालुक्यातील दक्षिण भागातील जुजारपूर येथील ओढा दर पावसाळ्यात ओसंडून वाहतो. यामुळे शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना पाण्यातून धोकादायक परिस्थितीत प्रवास करावा लागतो. यावर्षी देखील ओढ्याला पूर आला आहे. या ओढ्यावरील पूल जमीन पातळीवर असल्याने हा पूल पावसाळ्यात कायम पाण्याखाली असतो. यामुळे जुजारपूर जुनोनी या रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागते. यात पाटील वस्तीत जाणारा मार्गावर पुलचं नसल्याने प्रवाश्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो.

या ठिकाणी उंच पूल बांधल्यास पावसाळ्याचे चार महिने या परिसरातील ग्रामस्थांची होणारी अडचण कायमची दूर होणार आहे. मात्र या परिस्थितीकडे आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना नेते लक्ष्मण हाके यांनी दिली आहे. विषेश म्हणजे जुजारपूरम हे गाव शहाजीबापू पाटील यांच्यामागे कायम खंबीरपणे उभे राहिल्याचे मतदानातून दिसून येते. मात्र आपल्याचा मतदारांच्या प्रश्नाकडे ते लक्ष देत नसल्याची टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे. दरम्यान नागरिकांसह शाळकरी मुलांना देखील या पाण्यातून दररोज जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यामुळे भाषणबाजी करण्यापेक्षा शहाजीबापू पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्नाकडे लक्ष द्या अशी टीका विरोधक करत आहेत.

दरम्यान विरोधकांच्या टीकेनंतर आमदार शहाजी पाटील आपल्या मतदारसंघातील प्रश्नाकडे लक्ष देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


राज्यभरात ‘मुसळधार’, मुंबईत यलो अलर्ट जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा


First Published on: October 8, 2022 3:26 PM
Exit mobile version