प्राणी संग्रहालयातील पिंजर्‍यातून अजगर आले बाहेर; पर्यटकांची उडाली घाबरगुंडी!

प्राणी संग्रहालयातील पिंजर्‍यातून अजगर आले बाहेर; पर्यटकांची उडाली घाबरगुंडी!

प्राणी संग्रहालयातील पिंजर्‍यातून अजगर आले बाहेर; पर्यटकांची उडाली घाबरगुंडी!

लखनऊ येथील नवाब वाजिद अली शाह प्राणी संग्रहालय सकाळी नेहमीप्रमाणे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले होते. प्राणी संग्रहालय खुले होताच पर्यटक मोठ्या संख्येने प्राणी बघण्यासाठी सरसावले. दरम्यान, प्राणी संग्रहालयात जेथे अजगर ठेवले होते. त्या पिंजर्‍याबाहेर अनेक पर्यटक गोळा झाले होते. मात्र पिंजर्‍यात कुठेही अजगर दिसत नव्हते, त्यामुळे पर्यटकांची कुजबूज वाढली. कुठे आहे अजगर..? तो बघ..तो बघ.. पण अजगर काही दिसत नव्हते. साधारणत: अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. अचानक एका पयर्टकाचे लक्ष त्या पिंजर्‍याजवळ असलेल्या चिंचेच्या झाडावर गेले आणि त्याची बोबडी वळली. तो पर्यटक घाबरून अजगर.. अजगर अशी बोंब मारत पळाला. क्षणभर तो मस्करी करतोय, अशी बाकीच्यांची धारणा झाली. पण त्यांनी जेव्हा चिंचेच्या झाडावर बघितले तेव्हा खरंच दोन अजस्त्र अजगर महाशय चक्क पिंजर्‍याबाहेर असलेल्या त्या चिंचेच्या झाडावर विसावले होते.

पर्यटकांची उडाली घाबरगुंडी!

अजगर झाडावर विसावल्याचे पाहताच सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. जो तो वाट फुटेल त्या दिशेने पळू लागला. काय गोंधळ आहे पहाण्यासाठी प्राणी संग्रहालयाचे गार्ड तेथे आले. मात्र, चिंचेच्या झाडावरील ते दृश्य पाहून त्यांचाही डोळ्यावर विश्वास बसेना. पिंजर्‍यातील अजगर, पिंजर्‍या बाहेरील झाडावर कसे गेले, असे भले मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. पण पुढे जाण्याची हिंमत कोणालाही होईना. अखेर साप पकडणारा प्राणी संग्रहायलाच्या आदित्य तिवारींना तेथे बोलावण्यात आले आणि त्यांनी त्या दोन अजगरांना झाडावरून खाली उतरवले.

ज्या पिंजर्‍यात अजगर ठेवले होते त्या पिंजर्‍याचे छत उघडे होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे अजगर पिंजर्‍यातून बाहेर आले आणि झाडावर विसावले. त्या झाडाखाली मोठ्या संख्येने पर्यटक असतानाही केवळ नशीब बलवत्तर म्हणून अजगरांनी कोणालाही इजा केली नाही. मात्र, ते दोन अजगर पिंजर्‍यातले नाहीच, असा दावा आदित्य तिवारी यांनी केला. ते म्हणाले की, झूमधील अजगरांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते झाडावरील दोन अजगर बाहेरून आलेले आहेत. त्यांना पकडले असून त्यांची रवानगी पिंजर्‍यात करण्यात आली आहे. मात्र, झाडावरील अजगरांची बातमी कानोकानी संपूर्ण शहरात पसरली. आता त्या प्राणी संग्रहालयात जाण्यास कोणीही धजावत नसून रविवारी प्राणी संग्रहायलयात येणार्‍यांची संख्या १५०० असते. मात्र, मागील रविवारी तेथे फक्त १२० पर्यटक आले असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही पहा – Video : सापासोबत खेळणं पडलं महागात


 

First Published on: September 23, 2019 2:43 PM
Exit mobile version