दहशतवाद्यांनी जवानाचे अपहरण करुन केली हत्या

दहशतवाद्यांनी जवानाचे अपहरण करुन केली हत्या

जवान औरंगजेबची दहशतवाद्यांनी केली हत्या

जम्मू-काश्मिरमध्ये ईद साजरा करण्यासाठी सुट्टीवर निघालेल्या जवानाचे अपहरण करुन दहशतवाद्यांनी हत्या केल्याची घटना घडलीय. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता कलमपोरा येथून जवान औरंगजेब याचे दहशतवाद्यांनी अपहरण केलं. त्यानंतर रात्री ८ वाजता त्यांचा मृतदेह जवानांना सापडला. दहशतवादी समीर टाइगरचे इन्काऊंटर केलेल्या जवानांच्या टीममध्ये औरंगजेब तैनात होते.

४ ते ५ दहशतवाद्यांनी केलं अपहरण

शोपियाच्या शादीमार्ग येथे औरंगजेब तैनात होते. औरंगजेब राजौरी जिल्ह्यातील मेंढर येथे रहाणारे होते. ईद साजरी करण्यासाठी ते गुरुवारी सकाळी आपल्या घराकडे जात होते. शादीमार्ग येथील जवानांच्या कॅम्प बाहेर काही जवानांनी त्यांना घरी जाण्यासाठी कारमध्ये बसवून दिले. दरम्यान ते कलमपोरा येथे पोहचताच चार ते पाच दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले.

औरंगजेब यांची अपहरण करुन हत्या

औरंगजेब यांच्या गाडीच्या ड्राईव्हरने जवानांना दिलेल्या माहितीच्या आधारावर त्यांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. रात्री ८ वाजता पुलवामा जिल्ह्यातील गुसू येथे त्यांचा मृतदेह सापडला. दहशतवाद्यांनी औरंगजेब यांची गोळ्या घालून हत्या केली. औरंगजेब मेजर शुक्ला यांच्या टीममध्ये तैनात होते. मेजर शुक्ला यांनी काही महिन्यापूर्नी दहशतवादी समीर टाइगर याला ठार केले होते.

रमजानमध्ये ५८ दहशतवादी हल्ले

रमजान सुरु झाल्यापासून गेल्या २७ दिवसांमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन पटीने वाढ झाली आहे. या २७ दिवसांमध्ये ५८ दहशतवादी हल्ले झाले. तर रमजान महिना सुरु होण्याआधी १८ दहशतवादी हल्ले झाले होते. केंद्र सरकारच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईदनंतर दहशतवाद्यांविरोधात एकसंघ युध्दबंदी होईल. रमजानमुळे काश्मीरच्या सीमाभागात सर्च ऑपरेशनवर बंदी घालण्यात आली होती. या काळात दहशतवादी हल्ले तीन पटीने वाढले. या मुद्द्यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी बैठक बोलावली होती. मात्र याबाबत अद्याप औपचारिक घोषणा केली गेली नाही.

सुट्टीवर गेलेल्या जवानांना केलं लक्ष्य

याआधी देखील दहशतवाद्यांनी सुट्टीवर गेलेल्या जवानांना लक्ष्य केले होते. मे २०१७ मध्ये लेफ्टनंट उमर फयाज यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या केली. २२ वर्षाचे उमर शोपियांमध्ये आपल्या भावाच्या लग्नासाठी जात होते. तर २०१७ मध्येच शोपियांमध्ये जवान इरफान अहमद यांची देखील अपहरण करुन दहशतवाद्यांनी हत्या केली होती. इरफान अहमद यांचे घरातून अपहरण करण्यात आले होते.

First Published on: June 15, 2018 7:56 AM
Exit mobile version