दोन वेळचे जेवण मिळत नाही…; ७३ वर्षीय वडिलांनी संपवले जीवन, गुन्हा दाखल

दोन वेळचे जेवण मिळत नाही…; ७३ वर्षीय वडिलांनी संपवले जीवन, गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्लीः कोट्यधीश मुलगा मला दोन वेळचे जेवण देऊ शकत नाही, अशी व्यथा एका वडिलांनी मांडली आहे. मन हेलवणारी ही व्यथा सुसाईड नोटमध्ये मांडून ज्येष्ठ नागरिक जोडप्याने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी मुलगा, सून आणि भाच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माझ्या मुलाकडे ३० कोटीची संपत्ती आहे. पण तो मला दोन वेळचे जेवण देऊ शकत नाही. मी माझ्या लहान मुलाकडे राहत होतो. सहा महिन्यापूर्वी त्याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर सुनेने चुकीचे काम करण्यास सुरुवात केली. मी विरोध केला. मला घरातून मारहाण करुन हाकलून दिले. हे सर्व सुसाईड नोटमध्ये लिहिल्यानंतर त्या वयोवृद्ध जोडप्याने स्वतःला संपवण्यासाठी गोळ्या घेतल्या. गोळ्या घेण्याआधी त्यांनी पोलिसांना कॉल केला होता. पोलीस तत्काळ त्यांच्या घरी गेले. घरी पोहोचताच त्या जोडप्याने पोलिसांच्या हातात सुसाईड नोट दिली. विष घेतल्याने त्या दोघांची प्रकृती ढासळत चालली होती. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

हरियाणा येथे ही घटना घडली. येथील ७८ वर्षीय जगदीश चंद्र आर्य व त्यांची ७७ वर्षीय पत्नी भागली देवी यांनी सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. त्यांचा नातू विवेक आयएएस आहे. विरेंद्र असे विवेकच्या वडिलांचे नाव आहे. विवेक २०२१ मध्ये आयएएस झाला आहे. त्याचे सध्या प्रशिक्षण सुरु आहे.

२९ मार्चला ही घटना घडली. आर्य यांच्या सुसाईडमधील माहिती वेदनादायी आहे. माझ्या मुलाने मला घरातून हाकलून दिले. मी आणि माझी पत्नी अनाथ आश्रमात राहत होतो. काही दिवसांनी आम्ही घरी परत आलो. तेव्हा घराला टाळे होते. आम्ही दुसऱ्या मुलाकडे गेलो. त्यावेळी माझ्या पत्नीला अर्धांगवायू झाला. दुसऱ्या मुलाकडेही आम्ही अधिक दिवस राहु शकलो नाही. मुलगा मला शिळ अन्न देऊ लागला. शिळ अन्न खाण्यापेक्षा मला विष खाणं अधिक सोपं वाटलं. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या मृत्यूसाठी माझ्या दोन सुना, मुलगा व भाचा कारणीभूत आहेत. त्यांनी मला खूप त्रास दिला आहे, असे सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

आई वडिलांवर असा अत्याचार करणे योग्य नाही. सरकार व समाजाने त्यांना त्यांच्या कृत्याचा दंड ठोठवावा. बॅंकेत माझे काही पैसे आहेत. माझे दुकान आहे. हे सर्व आर्य समाजाला दान करावे, असेही जगदीश चंद्र यांनी पत्रात लिहिले आहे.

मात्र हे सर्व आरोप मुलगा विरेंद्रने फेटाळून लावले आहेत. आई वडिल आजाराने त्रस्त होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा दावा विरेंद्रने केला आहे.

याबाबत डीसीपी वीरेंद्र श्योराण यांनी सांगितले की, जगदीश चंद्र आर्य यांची सुसाईड नोट सापडली आहे. त्यांनी कुटुंबियांवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला आहे. तपास सुरु आहे.

 

 

 

First Published on: March 31, 2023 2:16 PM
Exit mobile version