पेन्शनसाठी ४ महिने आईचा मृतदेह ठेवला लपवून

पेन्शनसाठी ४ महिने आईचा मृतदेह ठेवला लपवून

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे चार महिन्यांपूर्वी निधन झालेल्या आईचा मृतदेह केवळ पेन्शन मिळवण्यासाठी घरातच लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाराणसीतील कबीरनगरमध्ये हा दुर्दैवी प्रकार उघडकिस आला. कबीरनगरमध्ये राहणाऱ्या चार मुलांनी आपल्या ७० वर्षांच्या आईच्या निधनानंतर तिच्यावर अंत्यसंस्कारच केले नाही. आईलची पेन्शन मिळत रहावी म्हणून आईचा मृतदेह केमिकल लावून त्यांनी तो घरातच ठेवला.

१३ हजारांसाठी मृतदेह ठेवला घरात
कबीरनगरमध्ये रहाणाऱ्या अमरावती देवी यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर अमरावती देवी यांना महिन्याला १३ हजार रुपये पेन्शन मिळत होती. अमरावती देवी यांचे १३ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले. त्यांच्यावर अत्यंसंस्कार न करता त्यांच्या चार मुलांनी पेन्शनच्या लालसेपोटी मृतदेह घरात ठेवला. हा मृतदेह खराब होऊन दुर्गंध पसरु नये, यासाठी त्यांनी मृतदेहाला रसायने लावण्यात आले होते.

शेजाऱ्यांमुळे झाला प्रकार उघड
अमरावती देवी या बऱ्याच दिवसापासून दिसल्या नाही. तसंच अमरावती देवींच्या कुटुंबातील व्यक्ती कोणालाच घरात येऊन देत नव्हते. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना फोन करुन ही माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी आरोपींच्या घरी छापा टाकला असता हा सगळा धक्कादायक प्रकार उघड झाला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींचे घर सील केले. तपासादरम्यान पोलिसांना मृत अमरावती देवींच्या हाताच्या अंगठ्याला शाईचे डाग दिसले. तसंच त्यांच्या घरातून अमरावती देवी यांच्या अंगठ्याचा ठसा असलेले पाच ब्लँक चेक सापडले.

बेरोजगारीमुळे केलं विकृत कृत्य
अमरावती देवींना पाच मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांचा मुलगा रवीप्रकाश, लालेप्रकाश, तिनू, गिरीष आणि मुलगी विजयालक्ष्मी एकत्र राहत होते. तर पाचवा मुलगा ज्योतीप्रकाश हा वेगळा राहत होता. अमरावती यांची मुलं बेरोजगार आहेत. अमरावती यांचे पती दया प्रकाश हे कस्टममध्ये नोकरीला होते. त्यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर अमरावती यांना पेन्शन सुरु झाली. या पेन्शनवर त्यांचे घर चालत होते.

जानेवारीतच अमरावतींचा झाला होता मृत्यू
जानेवारीमध्ये अमरावती आजारी पडल्या. त्यांना मुलांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नव्हती. त्यानंतर त्यांचं निधन झालं आणि मुलांनी मृतदेह घरी आणला. अमरावती यांचा मृत्यू झाल्याचं इतर कुटु्ंबियांनी सांगितलं. पण एका मुलाने मात्र आई जिवंत असून हात हालवत असल्याचं सांगितलं. आई कोमात असल्याचं शेजाऱ्यांना सांगत मृत अमरावती देवी यांचा मृतदेह घरात ठेवला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पेन्शनच्या पैशात चालवत होते घर
पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर अमरावती यांचा मृत्यू हा चार महिन्यांपूर्वीच झाल्याचं समोर आलं. चौकशीनंतर अमरावती यांच्या मुलांनीच बेरोजगार असल्याने पेन्शनसाठी हे कृत्य केल्याचं कबूल केलं. अमरावती यांच्या जावयाने देखील मदत केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.

First Published on: May 25, 2018 5:16 AM
Exit mobile version