राष्ट्रपतींच्या भावाचा श्रीलंकेतून पळ काढण्याचा प्रयत्न, संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखलं

राष्ट्रपतींच्या भावाचा श्रीलंकेतून पळ काढण्याचा प्रयत्न, संतप्त कर्मचाऱ्यांनी रोखलं

मागील काही दिवसांपासून श्रीलंकेत आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. श्रीलंकेत नागरिकांनी सरकारविरोधात मोठे आंदोलन पुकारले आहे. तसेच देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबाला लोकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे. दरम्यान, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या लहान भावाने श्रीलंकेतून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना विमानतळ कर्मचाऱ्यांनी रोखल्याचं सांगितले जात आहे.

राष्ट्रपतींचे लहान भाऊ बासिल राजपक्षे हे कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. बासिल हे देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, विमानतळावर इमीग्रेशन कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. विमानतळ कर्मचारी युनियनने बासिल राजपक्षे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला होता.

श्रीलंकेत सुरू असलेल्या या सर्व परिस्थितीवर अनेक देशांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये भारत, अमेरिका, चीन आणि जपानचा समावेश आहे. भारत आणि श्रीलंका यांचे द्विपक्षीय संबंध चांगले आहेत. काँग्रेस पक्ष या गंभीर संकटाच्या वेळी श्रीलंका आणि तेथील जनतेच्या पाठीशी उभा आहे, असं काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

कोण आहेत बासिल राजपक्षे?

बासिल राजपक्षे हे श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. तसेच श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबियांतील अनेकजण सरकारमध्ये सहभागी होते. अनेकांकडे महत्त्वाची खाती होती. श्रीलंकेतील आर्थिक संकटासाठी राजपक्षे जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.


हेही वाचा : इलेक्ट्रिक महामार्ग बनविण्याच्या सरकारी योजनेबाबत गडकरींची मोठी घोषणा


 

First Published on: July 12, 2022 1:13 PM
Exit mobile version