श्रीलंकेत दंगलसदृश्य परिस्थिती; सोशल मीडियावर बंदी करत कर्फ्यू लागू

श्रीलंकेत दंगलसदृश्य परिस्थिती; सोशल मीडियावर बंदी करत कर्फ्यू लागू

नेगोम्बो शहराच्या पोराथोटा भागामध्ये कर्फ्यू लागू

२१ एप्रिलला ईस्टर संडेला श्रीलंका साखळी बॉम्बस्फोटाने हादरले. श्रीलंकेतील हॉटेल आणि चर्चमध्ये तब्बल ८ साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. या घटनेनंतर श्रीलंकेतील वातावरण शांत होण्याचे नाव घेत नाहीये. श्रीलंकेच्या नेगोम्बोमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्याठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याठिकाणी स्थानिक सिंहली आणि मुस्लिम लोकांमध्ये दंगलसदृश्य परिस्थिती आहे. एका गाडीतूबन जाणाऱ्या काही लोकांवर तलवारीने हल्ला केल्याच्या घटनेनंतर कर्फ्यू लागू करण्यात आला. त्यानंतर सरकारने सोशल मीडियावर बंदी घातली आहे.

नेगोम्बो शहराच्या पोराथोटा भागामध्ये रविवारी काही जण गाडीमधून जात होते. त्यावेळी त्याच्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला तसंच एका वाहनाला पेटवून देण्यात आले. त्यानंतर परिसरामध्ये तणावाचे वातावरण पसरले. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला हस्तक्षेप करवाला लागला. या घटनेला पाहता प्रशासनाने नेगोम्बो आणि कोच्चिकाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कर्फ्यू लागू केला. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा कर्फ्यू ठेवण्यात आला होता.

श्रीलंकेतील चर्च आणि काही पंचतारांकित हॉटेलमध्ये २१ एप्रिलला साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. या बॉम्बस्फोटामध्ये २५० पेक्षा अधिक लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर ५०० पेक्षा अधिक जण जखमी झाले. या बॉम्बस्फोट प्रकरणी १०० पेक्षा अधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने स्विकारली आहे. या घटनेनंतर स्थानिक सिंघली आणि मुस्लिम समुदायातील लोकांमध्ये दंगल भडकली. अफवांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेगोम्बोमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, यूट्यूब, वाइबर, स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियांवर बंदी घालण्यात आली.

दरम्यान, श्रीलंकेवर साखळी बॉम्बस्फोट करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतातून ट्रेनिंग दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंकेत स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना काश्मीर आणि केरळमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या दहशतवाद्यांनी काश्मीर, केरळ आणि बंगळूरू असा प्रवास देखील केला असल्याचे उघड झाले आहे. श्रीलंकेचे लष्करप्रमुख महेश सेनानायके यांनी हा दावा केला होता. मात्र त्यांनी केलाला दावा जम्मू-काश्मीर पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी फेटाळून लावला आहे.

First Published on: May 6, 2019 4:40 PM
Exit mobile version