सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात; व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयातील कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात; व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणी

देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा वाढता आकडा हा धडकी भरवणारा आहे. अशापरिस्थितीत कोरोनाची दूसरी लाट अधिक चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक फैलावू नये म्हणून देशातील काही मोठ्या शहरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सर्वसामान्यांपासून बड्या लोकांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्यानंतर आता या कोरोनाने सर्वोच्च न्यायालयातही शिरकाव केल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयातील काही अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून येत आहे तर काहींना लागण झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयात साधारण एकूण ३ हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. यापैकी शनिवारपर्यंत ४४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने न्यायालयात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायधीश आपल्या निवासस्थानावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेणार आहेत. तर आज संपूर्ण न्यायालय आणि परिसरही सॅनिटाईज करण्यात येणार आहे.

यापूर्वी देखील दिल्लीत कोरोनाचा कहर सुरू असताना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने सर्व जिल्हा न्यायालयात प्रत्यक्ष होणाऱ्या सुनावणी थांबविल्या होत्या. तसे आदेश देखील त्यांना देण्यात आले होते. यानुसार नवे आदेश मिळाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयासह दिल्लीच्या सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये होणारी सुनावणी २३ एप्रिलपर्यंत आभासी म्हणजेच व्हिडिओ काँन्फरन्सिंगद्वारे होणार असल्याची माहिती मिळतेय. तसेच गेल्या आठवड्यात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये देखील कोरोनाचा फैलाव होत असल्याने सर्व न्यायालये ३ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


First Published on: April 12, 2021 11:08 AM
Exit mobile version