पाकिस्तानात मोफतच्या गव्हाच्या पीठासाठी चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू तर ८ जखमी

पाकिस्तानात मोफतच्या गव्हाच्या पीठासाठी चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू तर ८ जखमी

पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की आता खाण्यापिण्यासाठी इथले नागरिक एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. इथल्या लोकांची गहू आणि पीठासाठी मारामार होत आहे. गव्हाचं पीठ हे या देशासाठी मोठं संकट ठरलंय. गव्हाच्या पीठासाठी इथले लोक अक्षरशः तुटून पडले आहेत. गव्हाच्या पीठासाठी इथली परिस्थिती आणखी गंभीर होऊन चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. पीठासाठी लोक मरायला देखील तयार आहेत. हे वाचून तुम्हाला धक्का बसेल.

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये पीठ मोफत वाटलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी लोकांनी गव्हाच्या पीठासाठी मोठी गर्दी केली आहे. लोकांची गर्दी जमल्याने इथे चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत एक महिला आणि एक पुरुष ठार झाले आहेत तर आठ जण जखमी झालेत.

रमजानच्या पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ सरकार महागाईने त्रस्त असलेल्या गरिबांना मोफत पीठ वाटप करत आहे. रमजानमध्ये मोफत मिळत असलेले पीठ घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली आणि चेंगराचेंगरी झाली. याचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे, ज्यामध्ये महिला रस्त्यावर बसलेल्या दिसत आहेत. त्यांनी रास्ता रोको सुद्दा केला आहे.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात शनिवारी ४०,००० टन गहू चोरल्याप्रकरणी ६७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच त्यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. हाच गहू पाकिस्तानच्या भुकेल्या लोकांना खायला घालण्यासाठी रशियातून आला होता. हा गहू १० जिल्ह्यांतील सरकारी गोदामांमधून चोरीला गेला आहे. पाकिस्तानी चलनात सध्या गव्हाचं पीठ १५० रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला जात आहे.

पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मर्दान इथल्या क्रिडा संकुलात मोफत पीठ वाटपासाठी कोणतीही योग्य पद्धत वापरली नव्हती. तसंच यासाठी कोणतंही नियोजन नव्हतं. यावेळी फुकट पीठासाठी पात्र असलेल्या नागरिकांना तासनतास रांगेत उभे रहायला सांगितलं. यावर संतप्त लोकांनी आंदोलन केलं आणि नौशेरा रोड अडवला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर सुद्धा दगडफेक केली. यावेळी संतप्त नागरिकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यात चेंगराचेंगरी होऊन महिला आणि वयोवृद्धही बेशुद्ध झाले.

First Published on: March 27, 2023 5:02 PM
Exit mobile version