सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला दणका रवी राजांचे विरोधी पक्ष नेतेपद कायम

सर्वोच्च न्यायालयाचा भाजपला दणका रवी राजांचे विरोधी पक्ष नेतेपद कायम

मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते पदावर दावा करणारी भाजपची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावत रवी राजा यांच्या विरोधी पक्षनेते पदावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे भाजपला मुंबई उच्च न्यायालयापाठोपाठ आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही चांगलीच चपराक बसली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत रवी राजा यांनी आनंद व्यक्त केला असून काँग्रेसच्या गोटातही आनंदी आनंद आहे. इतके धक्के बसूनही आता या निकालाबाबत भाजपकडून फेरविचार याचिका दाखल केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सन २०१७ च्या निवडणुकीत शिवसेना व भाजप यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी शिवसेनेला सर्वात जास्त जागा मिळाल्या. तर दुसर्‍या क्रमांकावर भाजप आणि तिसर्‍या क्रमांकावर काँग्रेस होती. मात्र विरोधी पक्षनेते पदावर त्यावेळी भाजपने दावा न केल्याने पालिका नियमानुसार तिसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. त्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही सेना भाजप एकमेकांविरोधात लढले. सरकार स्थापन करण्याबाबत सेना भाजप यांच्यात टोकाचा वाद झाला आणि शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादीला हाताशी धरून महाविकास आघाडी स्थापन करून सरकार बनवले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे सेना भाजपात आणखीन टोकाचे वाद झाले.

या वादानंतर भाजपने पालिकेतील विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला. मात्र महापौरांनी पालिका नियमांचा दाखला देत भाजपचा दावा फेटाळून लावला होता. त्यावर भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने भाजपचा दावा फेटाळून लावला. या निर्णयाविरोधात भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण तिथेही भाजपच्या वाट्याला निराशा आली. यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी फेरविचार याचिका दाखल करणार असल्याचे भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

First Published on: February 17, 2021 4:23 AM
Exit mobile version