Coronavirus : सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव, न्यायाधीश ही करणार ‘वर्क फ्रॉम होम’

Coronavirus : सुप्रीम कोर्टात कोरोनाचा शिरकाव, न्यायाधीश ही करणार ‘वर्क फ्रॉम होम’

ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. भारतातही दिवसभरात 70 हजारांच्यावर नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. अशात सुप्रीम कोर्टातही कोरोनाने शिरकाव केला आहे. सुप्रीम कोर्टातील दोन न्यायाधीशांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे सुप्रीम कोर्टातील न्यायाधिशांना घरातूनचं काम करण्याचे आवाहन केले आहे.

गुरुवारी सुप्रीम कोर्टात जेव्हा सरन्यायाधीशांसह पाच सर्वोच्च न्यायमूर्ती 10.30 नंतरही आपापल्या कोर्ट रूममध्ये आले नाहीत तेव्हा कॉलेजियमची बैठक सुरू असल्याचे सर्वांनाच वाटले. परंतु नंतर समजले की, पाचही ज्येष्ठ न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेत या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी निर्णय घेत होते.

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, शुक्रवारपासून सुप्रीम कोर्टातील सर्व न्यायाधीशांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे पुन्हा कालचक्र सुमारे अडीच वर्षे मागे गेले आहे. सर्वोच्च न्यायालयात 22 मार्च 2020 पासून ऑनलाईन सुनावणी सुरू झाली. जेव्हा कोरोनाचे संकट वाढतचं गेले तेव्हा सर्व न्यायाधीश, निबंधक आणि कर्मचारी घरातूनच काम करत होते. मात्र 2021 च्या शेवटी न्यायालयाने पुन्हा प्रत्यक्ष न्यायालयात सुनावणीसाठी परवानगी दिली. मात्र आता पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण झालीय. म्हणजेच आता पुन्हा सुनावणीदरम्यान व्हीडीओ स्क्रीनवर वेगवेगळ्या विंडोमध्ये न्यायाधीश आणि वकील असतील. स्क्रीनवर योग्य सामाजिक अंतर असेल.

ओमिक्रॉनमुळे निर्माण झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आता सर्वोच्च न्यायालयात केवळ ऑनलाईन सुनावणी होणार आहे. यावेळी न्यायाधीश न्यायालयाऐवजी त्यांच्या घरातूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला उपस्थित राहतील.

10 जानेवारीपासून केवळ तातडीची प्रकरणे, ताजी प्रकरणे, जामीन प्रकरणे, नजर कैदीशी संबंधित प्रकरणे, अटकेची प्रकरणे किंवा अटकपूर्व जामीनासंबंधीत प्रकरणे आणि आधीच सुनावणीसाठी निश्चित केलेल्या प्रकरणांची सुनावणी होणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर माहिती घेत सर्वोच्च न्यायालयाने एक परिपत्रक जारी केले आहे.


Bird Flu : कोरोनाच्या संकटानंतर ‘बर्ड फ्लू’ चा धोका ; इंग्लंडमध्ये एका व्यक्तीला लागण


First Published on: January 7, 2022 9:54 AM
Exit mobile version