सुरतमध्ये रुग्णवाहिकेत सापडल्या 25 कोटींच्या नोटा, पोलीस तपासात आला वेगळाच ट्विस्ट

सुरतमध्ये रुग्णवाहिकेत सापडल्या 25 कोटींच्या नोटा, पोलीस तपासात आला वेगळाच ट्विस्ट

गुजरात :  गुजरातच्या सूरतमध्ये पोलिसांनी 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांनी भरलेले बॉक्स जप्त केले आहेत. रुग्णवाहिकेचा वापर साधारण आजारी आणि गरजू लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी केला जातो परंतु सुरतमध्ये बनावट नोटा इकडून तिकडे नेण्यासाठी रुग्णवाहिकेचा गैरवापर केला जात होता. सुरत पोलिसांनी रुग्णावाहिकेच्या एका बॉक्समधून 25 कोटी रुपयांत्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

या सर्व नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एैवजी रिव्हर्स बँक ऑफ इंडिया असे लिहिले होते त्यासोबत फक्त सिनेमाच्या शूटिंगसाठी असेही लिहिण्यात आले होते.पोलिसाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरतमधील लिंबायत भागात एका जाहीर सभेला संबोधित केले. याचवेळी संध्याकाळी सुरत जिल्ह्यातील कामरेज भागात तपासादरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा पकडल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, 2-2 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यावेळी नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत होते. अहमदाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेत बनावट नोटांचा मोठा साठा असल्याची माहिती सुरत ग्रामीण पोलिसांच्या कामरेज पोलीस ठाण्याला मिळाली होती. यावेळी कामरेज पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून बनावट नोटा घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला पकडले.

महामार्गावरील शिवशक्ती हॉटेलजवळ कामरेज पोलिस ठाण्याच्या पथकाने रुग्णवाहिका अडवली होती. मूळचा जामनगर येथील हितेश पुरुषोत्तम कोटडिया या रुग्णवाहिकेचा चालक होता. यावेळी रुग्णवाहिकेचा मागील दरवाजा उघडून तपासणी केली असता आतमध्ये 6 बॉक्स आढळून आले, त्यात दोन हजार रुपयांचे 1290 बंडल आढळून आले, ही रक्कम 25 कोटी 80 लाख इतकी आहे.

ज्या रुग्णवाहिकेतून ही चिठ्ठी जप्त करण्यात आली आहे त्यावर दिकरी एज्युकेशन ट्रस्ट मोटा वडाळा सुरत असे लिहिले आहे. यासोबतच गौ माता राष्ट्रमाता असेही लिहिले आहे. या रुग्णवाहिकेतून बनावट नोटांचे बंडल मिळाल्याची माहिती मिळताच सूरत ग्रामीणचे एसपी हितेश जोयसर यांनी स्वत: कामरेज पोलीस ठाणे गाठले. एसपी हितेश जोयसर यांनी प्रथम रुग्णवाहिका पाहिली, ज्यातून दोन हजार रुपयांच्या नोटांचे बंडल सापडले.

रुग्णवाहिकेतून जप्त करण्यात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा दुरून तंतोतंत खऱ्या दोन हजारांच्या नोटांसारख्या दिसतात, पण जवळून पाहिल्यावर लक्षात येते की, या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऐवजी रिव्हर्स बँक ऑफ इंडिया आणि सिनेमा शूटिंगसाठी असे लिहिले आहेत. याप्रकरणी आता रुग्णवाहिका चालकाची अधिक चौकशी सुरू आहे.

या बनावट नोटा कुठे जात होत्या, याचा शोध पोलीस घेत आहेत. चित्रपटाच्या शुटिंगमध्ये जर त्याचा वापर करायचा असेल तर तो चित्रपट कोणता आणि शूटिंग कुठे सुरू आहे? आणि बनावट नोटा रुग्णवाहिकेतून का नेल्या जात होत्या? याचाही तपास पोलीस करत आहेत.


बोरिवलीतील स्वस्तात मस्त लखनवी कुर्त्यांचं शॉप

First Published on: September 30, 2022 12:43 PM
Exit mobile version