राजस्थानमधील बंडखोर आमदारांवर कारवाई करा, सचिन पायलट यांची खर्गेंकडे मागणी

राजस्थानमधील बंडखोर आमदारांवर कारवाई करा, सचिन पायलट यांची खर्गेंकडे मागणी

जयपूर – काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राजस्थानमध्ये राजकीय वातावरण गढूळ झालं होतं. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गहलोत यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद संपला असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद अद्यापही शमलेला नाही. सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या समर्थक आमदारांवर टीका करत त्यांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत रोहित वेमुलांच्या आई आणि पूजा भट्ट सहभागी

सचिन पायलट यांनी म्हटलंय की, काँग्रेस अध्यक्षांनी राजस्थानच्या बंडखोर आमदारांना शिक्षा दिली पाहिजे. ज्या आमदारांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत, त्या नोटिसांना उत्तर देण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी सचिन पायलट यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना केली आहे. सचिन पायलट यांनी एका वृत्तवाहिनीसोबत केलेल्या चर्चेत ही मागणी केली आहे.

सचिन पायलट म्हणाले की, काँग्रेस एक जुना पक्ष आहे. या पक्षात प्रत्येकाला समान नियम आहेत. पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे कारवाई करतील अशी माझी आशा आहे. राज्यात येत्या १३ महिन्यांत निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षातील स्थितीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन पक्षाचे पर्यवेक्षक के.सी.वेणुगोपाल यांनी दिलं होतं, अशी माहिती सचिन पायलट यांनी दिली.

हेही वाचा – अयोध्येतील १४ कोस परिक्रमात धावपळ, श्वास नीट घेता न आल्याने भाविक बेशुद्ध

२५ सप्टेंबर रोजी जयपूर येथील मंत्री शांती धारीवाल यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) आमदारांच्या समांतर बैठकीनंतर गेहलोत यांच्या निष्ठावंत नेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. निरीक्षक म्हणून आलेल्या अजय माकन आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अहवालानंतर या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अशोक गहलोत उमेदवार होते. त्यामुळे राजस्थानचे मुख्यमंत्री पद कोणाकडे जाणार यावरून राजस्थानमध्ये वाद सुरू झाला होता. सचिन पायलट मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार होते. मात्र, काँग्रेस अध्यक्षांच्या वतीने त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (सीएलपी) बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलावण्यात आली होती. अशोक गेहलोत सरकारला पाठिंबा देणाऱ्या 102 आमदारांपैकी कोणत्याही आमदाराची मुख्यमंत्री म्हणून निवड करावी, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली होती.

First Published on: November 2, 2022 5:17 PM
Exit mobile version