नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, महाराष्ट्रासह १०० ठिकाणी धाडी

नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, महाराष्ट्रासह १०० ठिकाणी धाडी

नवी दिल्ली – नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांवर फंडिंग प्रकरणी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. दिल्ली, राजस्थानसह अनेक राज्यात आयकर विभागाने छापे टाकले असून नोंदणीकृत नसलेल्या राजकीय पक्षांवर करचोरीचा आरोप करण्यात आला आहे. तसंच, निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार ही छापेमारी करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे.

गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणासह देशातील अनेक राज्यात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आयकर विभागाने छत्तीगढमध्ये अनेक व्यावसायिकांवरही छापेमारी केली आहे. तसेच, वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत नसलेले राजकीय पक्ष आणि त्यासंबंधित असलेल्या अनेक संस्था, ऑपरेटरविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामुळे या पक्षांमार्फत सुरू असलेल्या गैरव्यवहारांवर निर्बंध घालण्याकरता आयकर विभागाने ही कारवाई सुरू केली आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आयकर विभागाने ही कारवाई केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या तपासणीदरम्यान ८७ राजकीय पक्षांना आरयुपीपी यादीतून हटवण्यात आले होते. यातील काही पक्षांवरच आयकर विभागाने छापे टाकले आहेत.

First Published on: September 7, 2022 12:38 PM
Exit mobile version