तेलंगणाच्या व्यक्तिवर १६ वर्षीय मुलाचा अमेरिकेत गोळीबार

तेलंगणाच्या व्यक्तिवर १६ वर्षीय मुलाचा अमेरिकेत गोळीबार

सुनील एडला यांचा न्यू जर्सी येथे गोळीबारात मृत्यू

अमेरिकेच्या न्यू जर्सी भागात एका १६ वर्षीय मुलाने भारतीय नागरिकावर गोळीबार केला आहे. मुळचे तेलंगणाचे असलेले सुनील एडला (वय ६१) यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे कळते आहे. वेटाँर शहराच्या सुनील यांच्या घराबाहेर १५ नोव्हेंबर रोजी सुनील यांची कार चोरी करताना हा प्रसंग घडला आहे.

सुनील एडला हे मुळचे तेलंगाणा राज्यातील मेडक जिल्ह्याचे रहिवासी आहेत. अटलांटिक शहरातील एका हॉटेलमध्ये ते काम करत होते. या घटनेच्या दिवशी सुनील रात्रपाळीसाठी आपल्या घराबाहेरील गाडीतून जात असताना एका लहान मुलाने त्यांची गाडी चोरण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्याने सुनील यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये सुनील यांचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती स्थानिक वृत्तपत्रांद्वारे कळते.

शुक्रवारी पोलिसांनी अल्पवयीन ओरोपीचा शोध लावून त्याला अटक केली आहे. बेकायदीशीरपणे हत्यार बाळगणे, चोरी, दरोडा आणि हत्येच्या गुन्ह्याखाली त्याची अटक करण्यात आली आहे. सुनील १९८७ मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले होते. पुढच्याच महिन्यात ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात येणार होते. सुनील यांच्या आईचा पुढच्या महिन्यात ९५ वा वाढदिस होता. त्यामुळे सुनील दोन महिन्यांची सुट्टी घेऊन भारतात कुटुंबियांसोबत वाढदिवस आणि नाताळ साजरा करणार होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.

अटलांटिक शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात सुनील यांचा सहभाग असायचा, ते उत्तम पियानो वादक असल्याचेही त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी स्थानिक वृत्तपत्रांना सांगितले आहे.

First Published on: November 18, 2018 11:45 AM
Exit mobile version