लग्नात मटना ऐवजी वाढले चिकन; मांडवात झाला तुफान राडा

लग्नात मटना ऐवजी वाढले चिकन; मांडवात झाला तुफान राडा

तेलंगणा लग्नात हाणामारी

‘समधी जी, बारातियों का स्वागत पान पराग से कीजिए गा’ हे वाक्य जरी कानावर पडले तर आपल्याला आठवते अशोक कुमार आणि शम्मी कपूर यांची एपिक जाहीरात. मुलाकडच्या मंडळीचे स्वागत करण्याची परंपराच भारतीय लग्नसंस्थेत आहे. मात्र तेलंगणा राज्यातील एका लग्नात घडलेली घटना वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. लग्न समारंभात जेवणात मटना ऐवजी चिकन वाढल्यामुळे संतापलेल्या वऱ्हाड्यांनी लग्न मंडपात वाद घालायला सुरवात केली. राग अनावर झाल्यानंतर काही वऱ्हाड्यांनी जेवण वाढणाऱ्या वेटरलाच थेट मारायला सुरवात केली आणि मग प्रकरण वाढतच गेलं.

दोन गटात हाणामारी

दरम्यान, नवऱ्या मुलाकडच्या नातेवाईकांनी मुलीकडच्या मंडळींना खुर्च्या आणि दगड फेकून मारायला सुरवात केली. त्यानंतर प्रकरण अधिकच चिघळलं आणि लग्न मंडपाचं रुपांतर एकप्रकारे युद्धभूमीत झालं. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणात लग्न मंडपातील १०० च्या आसपास खुर्च्यांचे नुकसान झाले आहे. तसेच सदर घटनेत आठ वऱ्हाडी मंडळी जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील मिळाली आहे. लग्नात हुंडा, मान-पान यांसारख्या गोष्टांमुळे वाद होतानाच्या घटना घडत असतात. मात्र आता जेवणावरुन झालेल्या वादाची यात भरपडली आहे.

दिल्ली मधील घटना

दिल्लीच्या जनकपूर येथील एका लग्न समारंभात देखील काही दिवसांपूर्वी अशीच काहीशी घटना घडली होती. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरु असलेल्या लग्न सोहळ्यात केवळ थंड जेवण वाढल्याने मुलाकडच्या काही मंडळिंनी वाद घालायला सुरवात केली. त्यांनी चक्क जेवण वाढणाऱ्या हॉटेलच्या वेटरला मारहाण करायला आणि वस्तूंची तोडफोड करायला सुरवात केली. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी सबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

First Published on: March 3, 2019 7:32 PM
Exit mobile version