दहशतवाद्यांचा आर्मी कॅम्पवर हल्ला, जवान शहीद

दहशतवाद्यांचा आर्मी कॅम्पवर हल्ला, जवान शहीद

दहशतवाद्यांची घुसखोरी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पााकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आर्मी कॅम्पवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, या हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला आहे. सोमवारी संध्याकाळी उशीरापर्यंत ही चकमक सुरू होती.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जवानांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले होत आहेत. कुलगाममध्येही आर्मी कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि आता पुलवामातील काकपोरा येथेही दहशतवाद्यांनी जवानांना लक्ष्य केले. या हल्ल्यात एक जवान व एक स्थानिक नागरीक जखमी झाला होता. या दोघांनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला.

जनरल रावत यांचा पाकिस्तानला इशारा
दरम्यान, शुक्रवारीदेखील जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका कॅम्पवर दहशतवाद्यांनी दुपारी ग्रेनेड फेकून हल्ला केला. दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ३४ राष्ट्रीय रायफलच्या नेहामा कॅम्पवर हा हल्ला करण्यात आला. लष्करप्रमुख जनरल बिपिनकुमार काश्मीरच्या पेहलगाममध्ये असतानाच हा हल्ला झाला होता. जनरल रावत यांनी शुक्रवारी पाकिस्तानला इशारा दिला की, काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेनजीकच्या नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केले जात आहे.

पोलिसांसह पाच जण जखमी
जम्मूमध्ये बीसी रोडवरील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन पोलिसांसह पाच जखमी झाले आहेत. पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्याने कठुआमधील शाळा बंद ठेवल्या आहेत. परिसरातील एक लाखांपेक्षा अधिक रहिवाशांनी भीतीने घरे सोडून पळ काढला आहे. यावर्षी झालेल्या गोळीबारात ३९ नागरिक मृत्यूमुखी पडले आणि १८ जवान शहीद झाले आहेत.

अतिरेक्यांकडून एकाची हत्या
काश्मीर खोऱ्यातील बांदीपोरा जिल्ह्यात गुरुवारी रात्री लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी एका रहिवाशाची गळा चिरून हत्या केली. उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात पोलिसांना मोहम्मद याकूब याचा मृतदेह आढळून आला. लष्कर-ए-तोयबाचा स्थानिक अतिरेकी सलीम पररे याचा या हत्येमागे हात असल्याचा दावा पोलीस करत आहेत. हत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही.

First Published on: May 29, 2018 7:10 AM
Exit mobile version