थायलंड पोलीस घेत आहेत भारतीयांचा शोध

थायलंड पोलीस घेत आहेत भारतीयांचा शोध

थायलंड पोलीस

या जगात कोणतेही घोटाळे होऊ शकतात. पैशाचा, भूखंडांचा, वाहनांचा आदी अनेक घोटाळे आपण ऐकले असतील, पण विवाहांचा घोटाळा झाला हे सांगितल्यास आपला विश्वास बसेल? थायलंडमध्ये कामानिमित्त अथवा अन्य काही कारणांसाठी जाणार्‍या भारतीय पुरुषांशी बनावट विवाह करून त्यांना व्हिसा मिळवून देणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी २७ महिलांस एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. उघडकीस आलेल्या या विवाह घोटाळ्यामुळे थायलंड सरकारचेही धाबे दणाणले आहेत. बनावट व्हिसाद्वारे थायलंडमध्ये रहाणार्‍या भारतीय व्यक्तींचा आता थायलंड पोलीस शोध घेत आहेत.

विक्रम लेहरीला ही भारतीय वंशाची व्यक्ती थायलंडची रहिवाशी आहे. त्याने थायलंडमध्ये अनधिकृतरित्या मॅरेज सेंटर उघडले होते. त्यासाठी त्याने २७ महिलांना कामाला ठेवले होते. या महिलांना तो दर महिन्याला आठ ते दहा हजार थाय भाट इतकी रक्कम द्यायचा. ज्या भारतीय व्यक्तींना थायलंडचा व्हिसा हवा असेल त्यांना विक्रम पैसे घेऊन मदत करायचा. त्याच्याकडे कामाला असलेल्या थाय महिलांपैकी एकीचा व्हिसा हवा असलेल्या व्यक्तीसोबत विवाह झाला आहे असे तो भासवायचा. त्यासाठी त्यांच्या लग्नाची कागदपत्रेही तो तयार करायचा. ती तयार झाल्यावर अधिकृतरित्या त्या विवाहाची थायलंडमध्ये नोंदणी केली जायची.

विवाहित महिला थायलंडची नागरीक असल्यामुळे तिच्या पती या नात्याने पुरुषाला थायलंडचा व्हिसा सहज मिळायचा. त्या व्हिसावर ती भारतीय व्यक्ती थायलंडमध्ये आली की, विक्रम तिच्याकडून पैसे घ्यायचा. मात्र विक्रमबाबत थायलंडच्या इमिग्रेशन ब्युरोला संशय आल्यानंतर त्यांनी, त्याच्यावर पाळत ठेवली. त्यावेळी हा घोटाळा उघडकीस आला. थायलंड पोलिसांनी विक्रम आणि त्याच्याकडे काम करणार्‍या महिलांना अटक केल्यानंतर आता बनावट व्हिसावर थायलंडमध्ये रहाणार्‍या भारतीय व्यक्तींचा थायलंड पोलीस शोध घेत आहेत.

७० वर्षांच्या महिलेचाही समावेश
विवाह नोंदणी केलेल्या भारतीय पुरुषांसोबत या महिला कधीही सोबत राहिलेल्या नाहीत. बर्‍याच चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेचे वय तर 70 वर्षे आहे.

First Published on: January 17, 2019 4:29 AM
Exit mobile version