कोरोना व्हायरसचे मुळ शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचा वटवाघुळांच्या गुहेत प्रवेश

कोरोना व्हायरसचे मुळ शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचा वटवाघुळांच्या गुहेत प्रवेश

अवघ्या जगाला कोरोना व्हायरसने छळल्यानंतर आता शास्त्रज्ञांनी आता त्याचे मुळ शोधण्यास सुरुवात केली आहे. यासाठी थायलंड देशातील दुर्गम भागातील गुहेमध्ये शास्त्रज्ञांनी प्रवेश केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार कोरोना व्हायरसचे मुळ हे वटवाघुळच असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. दक्षिण चीनमधील युनान येथे काही दिवसांपूर्वी वटवाघुळासोबत (Horseshoe Bats) कोरोनाचे नमुने जुळले होते.

थायलंडमध्ये Horseshoe Bats च्या १९ प्रजाती आढळून येतात. शास्त्रज्ञांना अजून यापैकी एकाही प्रजातीमध्ये कोरोना व्हायरस आढळून आलेला नाही. आपल्या संशोधनाची व्याप्ती वाढविण्यासाठी शास्त्रज्ञांनी थायलंडमधील कांचनबुरी येथील साई यॉर्क राष्ट्रीय उद्यानाकडे आपला मोर्चा वळविला आहे. येथील तीन गुहांमधून २०० वटवाघूळांना पकडण्यासाठी जाळे लावण्यात आले आहे. शास्त्रज्ञांना या गुहांपर्यंत पोहोचण्यासाठी ट्रेक करत जावे लागले होते.

थाई रेडक्रॉस संसर्गजन्य रोग आणि आरोग्य विज्ञान केंद्राच्या पथकाने वटवाघळांच्या लाळ, रक्त आणि स्टूलचे नमुने घेतले आहेत. रात्री वटवाघळांना पकडायचे आणि दिवसा त्यांचे सॅम्पल घ्यायचे अशी दिवसरात्र मेहनत शास्त्रज्ञांच्यावतीने केली जात आहे. हे करत असताना Horseshoe Bats सोबतच इतर वटवाघळांच्या प्रजातीचेही नमुने घेण्यात आले आहेत. प्राण्याद्वारे पसरणाऱ्या रोगाचा अभ्यास करण्यासाठी हे नमुने घेण्यात आले आहेत.

शास्त्रज्ञांच्या या चमुचे नेतृत्व सुपोर्न हे (Supaporn Wacharapluesadee) करत आहेत. मागच्या २० वर्षांपासून वटवाघुळ आणि त्यांच्या संबंधित आजारांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. थायलंडमध्ये चीनच्या नंतर पहिला कोरोनाचा रुग्ण शोधण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. सुपोर्न यांनी सांगितले की, थायलंडमधील वटवाघुळांमध्ये कोरोना व्हायरस आहे की नाही? हे आम्ही नक्कीच शोधू. कोरोना महामारीला सीमा रेषेचे बंधन नाही. वटवाघळांसोबत कोरोना व्हायरस कोणत्याही देशांमध्ये शिरु शकतो.

First Published on: August 13, 2020 11:34 AM
Exit mobile version