करोनाचे आव्हान मोठे, एकजुटीने हरवू!

करोनाचे आव्हान मोठे, एकजुटीने हरवू!

तंत्रज्ञानामुळे अमूलाग्र बदल केले. हे तंत्रज्ञानाचे युग आहे. याद्वारे दूरदृष्टी ठेवून शाश्वत विकास शक्य आहे. प्रत्येक युगात नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. आता करोना विषाणूने जगाच्या अर्थव्यवस्थेलाच आव्हान निर्माण झाले आहे. पण दूरदृष्टी आणि एकजुटीने आपण करोना विषाणूला पराभूत करू, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. इकॉनॉमिक टाइम्स ग्लोबल बिझनेस समिटमध्ये ते बोलत होते.

काही विशिष्ट वर्गातील लोकांनी लावलेले अंदाज हेच यापूर्वी अचूक मानले जात होते. पण आता काळ बदलला आहे. हा बदल तंत्रज्ञानाने घडवला आहे. सामान्य नागरिकही आता आपल्या कल्पना ठामपणे मांडू शकतात. बहुतेक वेळा या कल्पना जुन्या संकल्पनांना छेद देणार्‍या असतात, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. सत्तेत आल्यावर आम्ही जनतेच्या आपेक्षांचाच कायम विचार केला. नेहमी चांगली विचारसरणी ठेवा, असा मानणारा एक वर्ग आहे. त्यांचे म्हणणे योग्य आहे. पण जे योग्य मार्गावर चालतात त्यांना मात्र या वर्गाचा विरोध आहे. परिस्थिती बदलल्यावर हा वर्ग उणिवा आणि चुका काढू लागतो. मग ते स्वतःला न्यायदाते समजू लागतात.

तिहेरी तलाकविरोधी कायद्यावरही त्यांचा आक्षेप आहे. जे लोक निर्वासितांसाठी जगभर ज्ञान देत फिरत असतात त्यांचाच नागरिकत्व दुरुस्ती कायदाला विरोध आहे, असेही मोदींनी सांगितले. करोना विषाणूने भारतात शिरकाव केला आहे. आतापर्यंत भारतात २८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील बहुसंख्य हे इटलीचे नागरीक आहेत. ते पर्यटनासाठी भारतात आले होते. करोनाचा शिरकाव झाल्याचे उघड होताच केंद्र सरकारने देशातील सर्व राज्य सरकारांना प्रतिबंधित उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत.

First Published on: March 7, 2020 6:21 AM
Exit mobile version