भ्याड, सत्तेच्या भुकेल्या हुकूमशहापुढे कधीही झुकणार नाही; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

भ्याड, सत्तेच्या भुकेल्या हुकूमशहापुढे कधीही झुकणार नाही; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Karnataka Hijab Row: कर्नाटकातील हिजाब वादावर प्रियंका गांधी म्हणतात, 'हिजाब असो किंवा बुरखा...'

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुरुवारी सुरत जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळले असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींनी संसदेत संपूर्ण गांधी कुटुंबाचा आणि काश्मिरी पंडित समाजाचा अपमान केला होता. मात्र त्यांना शिक्षा किंवा अपात्र ठरवले नही, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.

प्रियंका गांधींनी एकामागून एक चार ट्विट करत राहुल गांधींच्या लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याबद्दल आपला संताप व्यक्त केला. प्रियंका म्हणाल्या की, ‘तुमच्या चमचांनी एका शहीद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर म्हटले. तुमच्याच एका मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधीचे वडील कोण? असा प्रश्न उपस्थित केला. कश्मीरी पंडितांच्या परंपरेनुसार, एक मुलगा वडिलांच्या मृत्यूनंतर डोक्यावर पगडी घालतो आणि आपल्या कुटुंबाची परंपरा जपतो.’ मात्र मोदींनी संसदेत गांधी कुटुंब आणि कश्मीरी पंडितांचा अपमान करताना ते नेहरू आडनाव का लावत नाही, असा प्रश्न विचारला होता. पण, त्यांना कोणत्याही न्यायाधीशाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली नाही किंवा संसदेतून त्यांना अपात्रही ठरवले नाही.

एक सच्चा देशभक्त म्हणून राहुल गांधींनी अदानी लुटीवर प्रश्न विचारला, नीरव मोदी आणि मेहूल चौकसीच्या लुटीवर प्रश्न विचारला होता. परंतु तुमचा मित्र गौतम अदानी देशाच्या संसदेपेक्षा आणि भारतातील जनतेपेक्षा मोठा झाला आहे का? त्यांच्या लुटीचा प्रश्न विचारल्यामुळे तुम्हाला इतका त्रास का झाला?

मोदी गांधी कुटुंबाला घराणेशाही म्हणतात. पण, याच कुटुंबाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी रक्त वाहिले आहे. या कुटुंबाने भारतातील लोकांचा आवाज उठवला आणि पिढ्यानपिढ्या सत्यासाठी लढा दिला आहे. आमच्या नसात धावणाऱ्या रक्ताची एक खासियत आहे की, ते तुमच्यासारख्या भ्याड, सत्तेच्या भुकेल्या हुकूमशहापुढे कधी झुकला नाही आणि कधीही झुकणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, अशा शब्दात प्रियंका गांधींनी मोदी सरकारवर आपला संताप व्यक्त केला.

First Published on: March 24, 2023 7:51 PM
Exit mobile version