विषारी दारुकांडप्रकरण : मुख्य आरोपी सापडला, पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती

विषारी दारुकांडप्रकरण : मुख्य आरोपी सापडला, पोलिसांना मिळाली धक्कादायक माहिती

नवी दिल्ली – विषारी दारू प्राशन केल्याने ७४ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीपैकी एक रामबाबू महतो याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादाय म्हणजे अवैध दारू विक्रीच्या अनेक प्रकरणात त्याच्यावर याआधीही अनेकदा कारवाई झाल्याचं समोर आलं आहे. त्याला दिल्लीतील द्वारका परिसरातून अटक करण्यात आली.

त्याच्यावर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. तसंच, पुढील कारवाईसाठी त्याला बिहार पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

हेही वाचा – जो दारू पितो तो नक्कीच मरतो, बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं अजब विधान

विशेष पोलीस आयुक्त रविंद्र सिंह यादव यांच्यानुसार, गुन्हे शाखेच्या आंतरराज्यीय विभागाला माहिती मिळाली होती की महतो दिल्लीत असल्याचं सांगितलं. त्याच्यावर पाळत ठेवून त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे पुढील कारवाईसाठी त्याला बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.


इसुआपूर पोलीस स्टेशन क्षेत्रातील डोईला येथे अमनौर, मधौरा आणि मसरख ब्लॉकमधील ७४ लोकांचा १४ डिसेंबर रोजी विषारी दारू प्राशन केल्याने मृत्यू झाला होता. या मृत्यूप्रकणाचे पडसाद तेथील विधिमंडळ अधिवेशनातही उमटले होते. दारू प्यायल्याने माणूस मरतोच, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले होते.


बिहारमध्ये दारुबंदी नसतानाही इतर राज्यात लोक मरायचे. लोकांनी स्वत: सावध राहावे. दारु वाईट आहे. त्यामुळे त्याचे सेवन करु नये. दारुबंदीचा अनेकांना फायदा झाला आहे. मोठ्या संख्येने लोकांनी दारु सोडली, ही चांगली गोष्ट आहे. अनेकांनी हा निर्णय आनंदाने स्वीकारला आहे. विषारी दारु प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच मी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत. दोषींना पकडावे आणि दारुचा व्यवसाय करणाऱ्यांना अटक करावी, असं नितीश कुमार म्हणाले होते.

First Published on: December 31, 2022 3:09 PM
Exit mobile version